जर्मनीच्या अॅन्सबच शहरात रविवारी रात्री उशिरा झालेल्या बॉम्बस्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर १२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रविवारी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी हा स्फोट झाल्याचे समजते. अॅन्सबचच्या एका बारमध्ये हा स्फोट झाला आहे. या बारपासून जवळच एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास अडीच हजारांहून अधिक संगीतप्रेमी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी जमले होते. या कार्यक्रमापासून थोड्याच दूर अंतरावर हा स्फोट झाला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार एका सिरियन नागरिकाला या कार्यक्रमात प्रवेश नाकाराला होता. त्यावेळी या कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काहीच दूर असलेल्या एका बारशेजारी त्याने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. पोलिसांच्या माहितीनुसार या सिरियन हल्लेखारोच्या पाठीवर असणा-या बॅगमध्ये स्फोटके होती. या स्फोटामुळे आतापर्यंत एक 1 जणांचा मृत्यू झालाय. मृत पावलेला हा हल्लेखोरच होता.  तर तीन जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार हा  हल्लेखोर मनोरुग्ण होता. तसेच याआधी त्याने दोनदा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. दोन वर्षापूर्वी तो जर्मनीत स्थायिक झाला होता. सरियातील परिस्थिती लक्षात घेता त्याला अॅन्सबचमध्ये राहायला देखील घर दिले होते.
हा दहशतवादी हल्ला होता की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच हा पूर्वनियोजीत कट होता का हे ही समजू शकले नाही. परंतु या हल्लेखोराच्या बॅगमध्ये असलेली स्फोटके पाहता त्याला अनेकांना ठार करायचे होते हे स्पष्ट आहे. पोलीस आता या हल्ल्याचा अधिक तपास करत आहे. गेल्या आठवड्याभरात जर्मनीत हा तिसरा हल्ला आहे. याआधी एका अल्पवयीन अफगाणिस्तान मुलाने ट्रेनमध्ये प्रवाशांवर कु-हाड आणि सु-याने हल्ला केला होता. यात चार जण गंभीर जखमी झाले होते. दोन दिवसांपूर्वी देखील जर्मनीतल्या म्युनिक शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला होता. यात दहा लोक ठार झाले होते..