गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाचवा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचा ब्रिटनने निषेध दर्शवला आहे. ब्रिटीश संसदेत या संदर्भातील एक प्रस्तावच मंजूर करण्यात आला असून यात गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भाग भारताच्या जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.

सध्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि पंजाब असे चार प्रांत आहेत. आता पाकिस्तानने गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाचवा प्रांत घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आणि चीनमधील आर्थिक हितसंबंधांच्या दबावातून पाकने हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. पण या निर्णयासाठी पाकला घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. या प्रस्तावामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कटूता निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरही या प्रस्तावाचा निषेध होत आहे. ब्रिटीश संसदेतील खासदार बॉब ब्लॅकमन यांनी एक प्रस्ताव मांडला. यात पाकिस्तानचा निषेध करण्यात आला होता. पाकिस्तान एका अशा भूभागावर कब्जा करत आहे जो त्यांचा भागच नाही असे त्यांनी म्हटले आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तान हे कायदेशीर आणि संवैधानिकदृष्ट्या भारतातील जम्मू काश्मीरचाच हिस्सा असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. १९४७ पासून पाकिस्तानने या भागावर अवैधरित्या कब्जा केला आहे. या भागातील लोकांना पाकने सुविधा दिल्या नाही, लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही दिले जात नाही असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या भागात काही बदल करणे हे क्षेत्रात अशांतता निर्माण करु शकेल अशी भीतीही प्रस्तावात वर्तवण्यात आली आहे. हा प्रस्ताव संसदेत मंजूर झाला आहे. भारताने गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भागावर नेहमीच दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन संसदेतील हा ठराव भारताला दिलासा देणारा आहे.