वक्तृत्व कला हा गुण आहे हे मान्यच. परंतु त्या कलेत नपुण्य मिळालेलं आहे म्हणून प्रत्येक फड जिंकता येतोच असं नाही.. सर्व फडांत बोलणं ही क्रिया समान असली तरी निवडणूक प्रचारसभेत राणाभीमदेवी थाटात बोलणारे, टाळ्याखाऊ भाषणांनी सभा जिंकणारे मुद्दय़ांवर, तपशिलावर अभ्यासू पद्धतीनं बोलायची वेळ आली की कसे गडबडतात याचं ताजं उदाहरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात अमेरिकेत सोमवारी रात्री (भारतात मंगळवारी पहाटे) झडलेली पहिली वाद फेरी.

प्रकृतीत तुलनेनं अशक्त, दोनदा तर सभांनंतर भोवळ येऊन पडलेल्या, न्यूमोनियाग्रस्त हिलरी क्लिंटन या आडदांड, सभा जिंकण्यासाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या, टीव्हीवाहिन्या- प्रसिद्धीप्रवीण अशा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर कशा काय टिकाव धरणार याची काळजी अनेक सज्जन व्यक्त करीत होते. पण प्रत्यक्षात घडलं ते उलटंच. क्लिंटनबाईंनी वाचाळवीर ट्रम्प यांना असं काही घोळात घेतलं की, दीड तासांच्या चच्रेनंतरही ते त्यातून बाहेर येऊ शकले नाहीत.

ट्रम्प यांच्या तुलनेत हिलरी यांची वक्तृत्वकला अगदीच मिळमिळीत. आवाजातही चढउतार नाहीत, नाटय़पूर्ण हावभाव नाहीत, अंगविक्षेप तर नाहीच नाहीत. आणि ट्रम्प यांच्याकडे हे सर्व. तेव्हा हिलरी यांनी ट्रम्प यांना चीतपट केलं कसं?

ते काम खरं तर ट्रम्प यांनी स्वतच दोन मार्गानी केलं. एक.. जे करायला हवं होतं ते न करून आणि दुसरं म्हणजे लक्षात घ्यायला हवं होतं त्याकडे दुर्लक्ष करून. ट्रम्प यांनी टाळलेले हे दोन मार्ग म्हणजे अभ्यास, पूर्वतयारी आणि दुसरं म्हणजे सभासभांतील फरक समजून न घेण्याचा, स्वतच्या वक्तृत्वकलेवर फाजील विश्वास ठेवण्याचा उद्दामपणा. निवडणुकांच्या प्रचारसभांत जे खपून जातं ते अभ्यासूंच्या बठकीत टिकत नाही. ट्रम्प यांना आज हे लक्षात आलं असेल. ही पहिली वाद फेरी सहा मुद्दय़ांभोवती फिरणारी होती. कशीही वरखाली करता येईल, अशी निवडणूक प्रचारसभा नव्हती. आणि समोर चटपटीत शाब्दिकतेला हंशा आणि टाळ्या देणारे पिटातले, गोळा केलेले प्रेक्षक नव्हते. तर कसलेले, आपापल्या व्यवसायातले यशस्वी, अभ्यासू अभिजन ही चर्चा ऐकायला आले होते. हेतू हा की आपला पुढचा अध्यक्ष काय आणि कसं करू इच्छितो हे जाणून घेणं. ट्रम्प यांनी या सर्वाना मोठय़ा प्रमाणावर निराश केलं. त्या तुलनेत, प्रचारसभांतून निष्प्रभ वाटणाऱ्या हिलरी क्लिंटन भलत्याच प्रभावी आणि तयारीच्या म्हणून समोर आल्या.

‘माझ्याबरोबरच्या या वादफेरीसाठी ट्रम्प माझ्याविरोधात टीकेचे कोणकोणते मुद्दे असू शकतात याचा चांगलाच अभ्यास करून आलेले आहेत. मी पण तयारी केलीय. पण ती तयारी आहे अध्यक्ष झाल्यावर काय काय करावं लागेल याची,’ अशा भाषेत िक्लटन यांनी असा काही वाक्ठोसा ट्रम्प यांना हाणला की ते सरभरच झाले.

मी उद्योगांसाठी कर सवलती देईन, त्यांना प्रसार करता यावा यासाठी मदत करीन, आज अनेक चिनी, जपानी किंवा मेक्सिकन आपल्या तरुणांच्या नोकऱ्या पळवतायत. मी ते रोखीन, हा ट्रम्प यांचा दावा. पण स्वस्त मजुरीच्या शोधात नवनव्या देशात जाणाऱ्या उद्योगांना रोखीन म्हणजे काय, या प्रश्नावर ट्रम्प यांना काही फारसं बोलता आलं नाही. ते आपले मी हे करीन.. हेच पालुपद लावत बसले. अखेर सूत्रसंचालकाला ट्रम्प यांना रुळावर आणावं लागलं. ट्रम्प वेगवेगळे दावे करीत होते. त्यावर िक्लटन इतकंच म्हणाल्या.. ट्रम्प हे स्वतच्या वास्तवात जगतात.. ते त्यांच्यापुरतंच मर्यादित असतं. हा टोलादेखील सणसणीत होता. िक्लटन यांचं वाक्चातुर्य आणखी एका ठिकाणी दिसलं. ट्रम्प आपल्याला कोण कोण काय म्हणालं याची लंबीचवडी यादी सांगत बसले. त्यांचं बोलणं झालं. क्लिंटन यांची बोलायची वेळ आली. एक मोठ्ठा सुस्कारा सोडून क्लिंटन म्हणाल्या.. जस्ट लिसन्ड टू व्हॉट ही हर्ड.. क्लिंटन यांच्या टोमण्यानंतर मिळालेला हंशा बरंच काही सांगून जाणारा होता. हिलरी िक्लटन यांनी ट्रम्प यांना निरुत्तर केलं ते त्यांची महिलाविषयक मतं उद्धृत करून. महिलांविषयी ट्रम्प यांनी आतापर्यंत वारंवार अनुदार उद्गार काढले आहेत. हिलरी यांनी त्याचे दाखले दिले आणि तुम्ही जिचा अपमान केला होतात ती महिलाही या निवडणुकीत मतदान करणार आहे, हे विसरू नका.. असं त्यांना बजावलं.

खरं तर हिलरी या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत. तेव्हा चच्रेत प्रश्न उपस्थित करण्याचं चातुर्य ट्रम्प यांनी दाखवायला हवं होतं. पण प्रत्यक्षात झालं ते असं, हिलरी आपल्या मुद्दय़ांद्वारे ट्रम्प यांच्यासाठी सापळा रचत गेल्या आणि हा वाचाळवीर एकेक करत त्या सापळ्यात अडकत गेला. त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना ट्रम्प यांनी िक्लटन यांना लगावलेले दोन टोमणे त्यांना चच्रेत काय करता आलं असतं याची चुणूक दाखवणारे ठरले. या निवडणुकीत मी दोघांविरोधात लढतोय.. एक क्लिंटन आणि दुसरा अदृश्य उमेदवार म्हणजे त्यांची तळी उचलणारी प्रसिद्धी माध्यमं.. याचा संदर्भ दोनच दिवसांपूर्वी वॉिशग्टन पोस्ट आणि त्याआधी न्यूयॉर्क टाइम्स या तालेवार दैनिकांनी ट्रम्प अध्यक्ष होण्यास किती अयोग्य आहेत, असं सांगत त्यांच्या विरोधात घेतलेल्या जाहीर भूमिकेशी होता. या दोन्ही वर्तमानपत्रांनी आपल्या संपादकीय भूमिकेद्वारे ट्रम्प यांना विरोध केला आहे. त्याचा राग नाही म्हटलं तरी ट्रम्प यांच्या मनात असणारच. न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्याबाबत दिलेल्या एका अचूक बातमीचा दाखला देत ट्रम्प म्हणाले.. ‘न्यूयॉर्क टाइम्सनं अचूक बातमी देणं तसं दुर्मीळच.’

या तुलनेत क्लिंटन यांनी असे कोणतेही वाग्बाण सोडले नाहीत. त्या चच्रेच्या कार्यक्रमपत्रिकेच्या बाहेरही गेल्या नाहीत. मुद्दय़ांच्या चौकटीत राहूनच त्यांनी ट्रम्प यांची दिवाळखोरी, त्यांचं कर न भरणं, वेगवेळ्या मुद्दय़ांवर उलटसुलट भूमिका घेणं हे सगळं दाखवून दिलं. पण त्या वेळी ट्रम्प यांची सगळी तडफड सुरू होती ती मात्र चच्रेची चौकट कशी तोडता येईल, यासाठी. ती चौकट त्यांना तोडायची होती. कारण मग वाटेल तसं बोलता आलं असतं आणि हिलरी यांना घायाळही करता आलं असतं. पण ट्रम्प यांना ते काही शेवटपर्यंत जमलं नाही. अशा वेळी चच्रेचा निकाल सोपा होता, पहिली फेरी क्लिंटन यांनी जिंकली!

तात्पर्य : चौकटीबाहेर राहून वाटेल त्या फुशारक्या मारणारे एकदा का चौकटीत आले की निष्प्रभ होतात.

वॉशिंग्टन डीसीसाठी तीन मते

अमेरिकी अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या गणितात राजधानी वॉशिंग्टन डीसीला तीन मते निश्चित करण्यात आली आहेत. मंगळवारच्या अंकातील यूएस ओपनया सदरात ही मते दोन असल्याचा उल्लेख अनवधानाने झाला आहे.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber