सर्वच्या सर्व पत्रकार विकले गेलेत.. बडय़ा उद्योगधंद्यांचं आणि त्यांचं साटंलोटं आहे.. माझ्याविरोधात भूमिका घेण्यासाठी त्यांना पसे देण्यात आलेत.. यातले काही तर देशविरोधी आहेत.. देशाला पुन्हा एकदा महान करणं हे माझं स्वप्न आहे.. मी यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही..

या विधानांनी गरसमज होण्याची शक्यता आहे. पण आधीच सांगायला हवं, ही विधानं अमेरिकेतली आहेत. जगातल्या एकमेव महासत्तेच्या प्रमुखपदी आरूढ होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचं हे म्हणणं आहे. अमेरिकेत आता त्यांच्या या माध्यमस्नेहाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीये. ताजं कारण म्हणजे हिलरी क्लिंटन यांच्याशी त्यांची झडलेली पहिलीच अध्यक्षीय वादफेरी.

अवघ्या सहा आठवडय़ांवर आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीतली पहिली वादफेरी पार पडल्यानंतर अमेरिकाभर चर्चा आहे ती या वादात कोण जिंकलं-हरलं याची. या चच्रेत जो तो अर्थातच आपापल्या पक्षीय जवळिकीप्रमाणे मत व्यक्त करणार. म्हणजे रिपब्लिकन समर्थकांना डोनाल्ड ट्रम्प यांची कामगिरी लई भारी वाटणार, तर डेमोक्रॅटिक मंडळींची प्रतिक्रिया हिलरी क्लिंटनबाईंनी दाखवला की नाही इंगा.. अशीच असणार. त्यात गैर ते काय?

पण या दोन्हीही गटातटांतल्यांचं या वेळी एका मुद्दय़ावर एकमत आहे. ते म्हणजे ट्रम्प यांना वाटत होतं तितकं काही यश या वादफेरीत मिळालेलं नाही. अगदी रिपब्लिकन समर्थकही म्हणतात, ट्रम्प यांनी जरा अधिक तयारी करायला हवी होती.

पण ही तयारी म्हणजे काय?

तर अवघड प्रश्नांना भिडण्याचा मोकळेपणा. हे अवघड प्रश्न कोण विचारणार? तर साहजिकच पत्रकार. मग ट्रम्प हे या वादफेरीआधी पत्रकारांना भेटत नव्हते का?.. मुलाखती देत नव्हते का?.. तर देत होते. अनेक छोटय़ा-मोठय़ा वर्तमानपत्रांना, वाहिन्यांना त्यांनी मुलाखती दिल्या.

पण फरक असा की त्यांनी मुलाखतीसाठी निवडलेली वर्तमानपत्रं आणि वाहिन्या आणि पत्रकार हे सर्वच्या सर्व त्यांचीच तळी उचलणारे होते. ट्रम्प यांच्या मुद्दय़ांना आव्हान देईल, त्यांची वैचारिक निष्ठा तपासून पाहील आणि बौद्धिक पातळीवर त्यांची कसोटी लागेल.. अशी एकही मुलाखत, एकाही पत्रकाराला त्यांनी अजूनपर्यंत दिलेली नाही. उलट त्यांचा खाक्या असा की आपल्यावर टीका करणारा तो बोगस, विकला गेलेला पत्रकार. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट अशा नामांकित वर्तमानपत्रांना ट्रम्प यांनी कंडम ठरवून टाकलंय. वॉशिंग्टन पोस्टसारख्या वर्तमानपत्राच्या वार्ताहराला त्यांनी एकदा तर पत्रकार परिषदेतनं बाहेर काढलंय. त्यांच्या या पत्रकारसंबंधांच्या सुरस कहाण्या अमेरिकेतील माध्यमांत मोठय़ा चवीनं चघळल्या जातायत.

आता या वर्तमानपत्रांत एखाद्या राजकारण्याच्या विरोधात वा समर्थनार्थ ठरवून भूमिका घेतली जात नाही असं नाही. बॉब वुडवर्डसारखा ज्येष्ठ पत्रकार त्याच्या बुश यांच्या जवळिकीसाठी ओळखला जातोदेखील. परंतु म्हणून या वर्तमानपत्रांची वृत्तनिष्ठा संशयास्पद आहे, असे म्हणता येणार नाही. सत्याच्या, बौद्धिकतेच्या कसोटीवर समोरच्या नेत्याला घासूनपुसून, वाजवून बघणं, हे चांगल्या पत्रकारांचं काम अमेरिकेत ही वर्तमानपत्रं कित्येक र्वष करताहेत. त्याच हिरिरीने त्यांनी ट्रम्प यांनाही तपासायला सुरुवात केली. नारळ वाजवून जसं आत पाणी किती आहे ते कळतं, तसं नेत्यांना वाजवलं की आत मजकूर किती हे पत्रकारांना कळतं. ट्रम्प यांचीही अशीच माध्यमतपासणी सुरू झाली. अनेकांच्या लक्षात आलं.. आत काही फार नाही.. त्यांनी तसं ते मांडलं.

झालं. ट्रम्प खवळले. सगळेच्या सगळे पत्रकार कसे विकले गेलेत, बडय़ा उद्योगधंद्यांशी त्यांचे लागेबांधे आहेत, माझ्याविरोधी भूमिका घेण्यासाठी त्यांना पसे देण्यात आलेत.. वगैरे आपली वाटावीत अशी अनेक विधानं ट्रम्प यांनी केली. याचा परिणाम असा झाला की खऱ्या पत्रकारांपेक्षा भुरटय़ा नाही पण कमअस्सल म्हणता येईल अशाच पत्रकारांना ते मुलाखती देत बसले. त्यांना वाटलं हे असंच असतं. सगळं सोप्पं. हा समज किती बेगडी आहे हे सोमवारच्या अध्यक्षीय वादफेरीनं दाखवून दिलं.

सोप्या पत्रकारांना भेटल्यानं वर्तमान बरं जात असलं तरी भविष्य अवघड होतं, हा यातला धडा आहे. अनेकांनी घेण्यासारखा.

पण चांगली पत्रकारिता जोखायची कशी?

सोपं आहे. जी नेत्यांच्या उलटतपासणीची हिंमत दाखवते, या नेत्यांची एखाद्या प्रश्नावरची भूमिका पूर्वी काय होती आणि आता काय आहे, याची जाणीव करून देते, त्यासाठी वास्तवाचा आधार घेते आणि हे वास्तव जसं आहे तसं समोर मांडते ती चांगली पत्रकारिता. सोमवारच्या अध्यक्षीय वादफेरीनंतर ब्लूमबर्ग, सीएनएन अशा अनेक वाहिन्यांनी या चच्रेतले नेते काय बोलले आणि वास्तव काय आहे याची ताबडतोब शहानिशा केली आणि अमेरिकी जनतेसमोर मांडली.

म्हणजे या चच्रेत हिलरी क्लिंटन असं म्हणाल्या की ग्लोबल वॉर्मिंग वगरे संकल्पना काही ट्रम्प यांना मान्य नाहीत. हा मुद्दा ट्रम्प यांनी फेटाळला. आपण असं बोललोच नाही, असं ट्रम्प म्हणाले.

या दोन्ही वाहिन्यांनी चच्रेनंतर काही तासांतच ट्रम्प यांची या विषयावरची विधानं तारीखवार प्रसृत केली. निष्कर्ष.. ट्रम्प खोटं बोलले.

या वादफेरीत ट्रम्प यांनी किती राज्यातनं किती रोजगार मेक्सिकोसारख्या देशात निघून गेले, याचा तपशील सादर केला. या दोन्हीही वाहिन्यांनी दाखवून दिलं, या आरोपात काहीही तथ्य नाही. या चच्रेत हिलरी क्लिंटन यांनी आपल्या धोरणांमुळे किमान एक कोटी रोजगार तयार होतील असा दावा केला. सीएनएनचा निकाल : दावा असत्य नाही, पण निश्चितच अतिरंजित आहे. या चच्रेत ट्रम्प आपण कसे स्वयमेव मृगेंद्रता आहोत, असं दाखवत होते. त्यावर हिलरी क्लिंटन म्हणाल्या, त्यांना वडिलांकडून १ कोटी ४० लाख डॉलर्सचं कर्ज मिळाल्यानं व्यवसाय सुरू करता आला. दोन्हीही वाहिन्यांनी निर्वाळा दिला, क्लिंटन यांचं म्हणणं खरं आहे. ट्रम्प म्हणाले, न्यूयॉर्कमध्ये हल्ली गुन्हेगारीचं प्रमाण चांगलंच वाढलंय. क्लिंटन यांनी तो मुद्दा फेटाळला. या दोन्ही वाहिन्यांनी आकडेवारी तपासली. त्यात आढळलं, ट्रम्प यांचं हे म्हणणं केवळ निवडणूक प्रचारासाठी आहे.

..अशा तऱ्हेनं चांगली माध्यमं अमेरिकेत आपली जबाबदारी पार पाडताना दिसतात. यातल्या काहींवर ट्रम्प यांचा राग असणं त्यामुळे साहजिकच आहे. त्यांना काही ट्रम्प यांनी मुलाखती दिलेल्या नाहीत. शेवटी, राजकारणी अमेरिकेतले झाले म्हणून काय झालं, मुलाखती देण्यासाठी हाताळायला सोपे पत्रकार त्यांनाही हवेच असतात.

तात्पर्य : जे सोपे आहे ते सोयीचे असेल, पण सुखाचे असेलच असे नाही.

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter @girishkuber