निवडणुका लढणं हे एक शास्त्र आहे, भावना, राजकीय मुद्दे वगरे काहीही असलं तरी थंड डोक्यानं निवडणुका शास्त्रशुद्ध पद्धतीनं लढता येतात याचं पहिलं उदाहरण कोणतं.. हा प्रश्न अँड्रय़ू क्लॅस्टर याला विचारल्यावर त्याचं उत्तर धक्कादायक होतं.

अमेरिकेच्या निवडणुकांसाठी इथे येताना ज्या काही मोजक्या माणसांना भेटण्याची उत्सुकता होती, त्यात अँड्रय़ू क्लॅस्टर हे नाव आघाडीवर होतं. २००८ साली आणि पुन्हा २०१२ साली अध्यक्षीय निवडणुकांत बराक ओबामा यांनी जे काही ऐतिहासिक विजय नोंदवले त्या निवडणुकांतला अँड्रय़ू हा पडद्यामागचा बिनीचा शिलेदार. २००८ साली तर ओबामा हे प्राथमिक निवडणुकांत स्वपक्षीय आव्हानदेत्या हिलरी क्लिंटन यांच्याही मागे होते. आयोवा राज्यात ओबामा यांनी पहिल्यांदा आघाडी घेतली आणि मग निवडणुकांचं चित्र बदलू गेलं.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
loksabha election 2024
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करताना तरुणींनी उघडपणे मांडली भूमिका; जाणून घ्या त्या काय म्हणाल्या?

हे शक्य झालं कारण यामागे होती प्रचंड तयारी. २० लाख स्वयंसेवक, चार हजार कर्मचारी यांनी निवडणुकीपूर्वी १४ कोटी ६० लाख इतक्या वेळा प्रत्यक्ष मतदारांशी साधलेला थेट संपर्क आणि अत्यंत शास्त्रीय मार्गानी मांडलेली प्रत्येक मतदाराची कुंडली. हे सगळं ज्यांनी घडवलं ती व्यक्ती म्हणजे अँड्रय़ू. माहिती विश्लेषण हा त्याच्या अभ्यासाचा विषय. मिळेल तितकी माहिती गोळा करायची, ती विविधांगांनी तपासायची, तिचं विश्लेषण करत त्या माहितीला आकार द्यायचा यासाठी एक नवीनच अभ्यासशाखा अलीकडच्या काळात उदयाला आली आहे. अ‍ॅनालिटिक्स. अमेरिकेतल्या काही आघाडीच्या अ‍ॅनालिटिक्समधलं अँड्रय़ू हे एक नावं. त्याला भेटायचं होतं ते हे शास्त्र समजून घेण्यासाठी. भारतात नंदन निलेकणी यांच्यासारख्या संगणक तज्ज्ञाच्या मदतीनं अँड्रय़ूनं काम केलंय. त्यामुळेही त्याचा दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक होतं. वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रेगन विमानतळाच्या लाउंजमधे भल्या सकाळी त्याच्याशी दोनेक तास गप्पा झाल्या. त्याची सुरूवात अर्थातच निवडणूक हे शास्त्र आहे, शास्त्रीय पद्धतीचा आधार घेत त्यात उतरता येतं याची पहिली नोंद कोणती या प्रश्नानं?

अब्राहम लिंकन हे त्याचं पहिलं उदाहरण, हे अँड्रय़ूचं उत्तर. १८४० साली निवडणुकांआधी लिंकन यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्व मतदार संघातल्या प्रत्येक मतदाराचीच असं नव्हे तर २१ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवायला सांगितलं होतं. ती नोंद करताना ही व्यक्ती आपली पाठिराखी, विरोधक की तटस्थ असं वर्गीकरण केलं गेलं होतं. तो अशा शास्त्राचा पहिला दाखला! आणि दुसरा?

थेट २००८ सालची ओबामा यांची निवडणूक. २००४ साली त्याची तयारी सुरू झाली. त्यावेळी डेमोक्रॅटिक पक्ष सातत्यानं निवडणुका हरत होता. यातनं मार्ग काय हे सुचत नव्हतं. त्यावेळी पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर डेमोक्रॅटिक पक्षानं मतदार यादीचं दस्तावेजीकरण सुरू केलं. या माहितीचं विश्लेषण केलं कसं, हे विचारल्यावर अँड्रय़ूनं तिथल्या कागदी रूमालावर एक आलेख काढला. त्याचा तळाचा अक्ष म्हणजे निवडणूक वर्ष आणि उभा अक्ष समाधानाची पातळी. तो पर्यंतची मतदानाची आकडेवारी या आलेखात भरल्यावर तो आलेख उंच सखल असा दिसायला लागला. म्हणजे तो उंच होता त्या ठिकाणी मतदारांचं समाधान आणि मतदान यांचा थेट संबंध होता. त्यात अर्थातच डेमोक्रॅट्स जिंकले होते. असे बिंदू नक्की केले गेले. त्यावेळी मतदार डेमोक्रॅटीक पक्षाबाबत का समाधानी होते, याची कारणं काढली गेली आणि पुढचा प्रवास सुरू झाला.

तो होता प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणं. निवडणुकीपूर्वी अमेरिकतेल्या प्रत्येक मतदाराशी ओबामा यांच्या तुकडीनं ईमेल, दूरध्वनी अशा माध्यमातनं तब्बल १० वेळा संपर्क साधला. त्याच्या बरोबरीनं अँड्रय़ू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी एक क्लृप्ती केली. ओबामा समर्थक आणि विरोधक अशा मतदारांची यादी केली. त्या मतदारांच्या घरी टिव्ही संच आहेत का, असल्यास ते कोणाची सेवा घेतात याचीही नोंद केली. आणि नंतर फक्त विरोधकांच्या घरच्या टिव्ही संचावरच दिसतील अश पद्धतीनं जाहिरातींचं वितरण केलं. अमेरिकी टिव्ही बाजारपेठेत हे तंत्रज्ञान नुकतंच विकसित झालेलं. त्याचा इतका अचूक फायदा ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेनं घेतला की विरोधकांच्या घरी आवाहनात्मक जाहिराती आणि समर्थकांच्या घरी.. तुमचा निर्णय किती योग्य आहे.. असा संदेश देणाऱ्या जाहिराती अशी विभागणी त्यांनी केली. म्हणजे टिव्ही जाहिरातीसाठी जी काही रक्कम खर्च होत होती तिचा दुहेरी वापर झाला. त्याचवेळी रिपब्लिकन पक्ष मात्र सरसकट जाहिराती करत होता. जो आपला ग्राहक नाही त्यासमोर आणि जो ग्राहक आहे त्यासमोर एकच जाहिरात करणं म्हणजे पशाचा अपव्यय, असं अँड्रय़ू सांगतो. परत या सरधोपट एक-जाहिरात पद्धतीत जो विरोधक आहे तो दुखावतो आणि समर्थक जाहिरातीला कंटाळतो, असं त्याचं निरीक्षण. ते नोंदवत असताना आपल्याकडच्या ‘अच्छे दिन’ आणि ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..’ या जाहिरातींची आठवण झाली.असो.

पण जे काही अँड्रय़ू आणि पथकानं केलं त्याची परिणामकारकता मोजली कशी गेली? अँड्रय़ू सांगतो.. त्याचं उत्तर आकडेवारी. १४ कोटी ६० लाख मतदारांशी आम्ही प्रत्यक्ष संपर्क साधला. ओबामा यांना पहिल्या खेपेत ६ कोटी ९० लाख आणि दुसऱ्या वेळी ६ कोटी ७० लाख मतं मिळाली. ही आकडेवारी बोलकी अशासाठी आहे की पारंपरिक डेमोक्रॅटिकविरोधी राज्यांत ओबामा यांना २५ टक्के अधिक मतदान झालं. ही बाब ऐतिहासिक. कारण पारंपारिक विचारधारांत डेमोक्रॅटिक उमेदवार ही राज्य आपली नाहीतच असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत. ओबामा यांनी ही चूक टाळली. त्यामागे अर्थातच ही शास्त्रशुद्ध पद्धत. आणि दुसरं म्हणजे अमेरिकी पारंपारिक गोरे हे अफ्रिकी उमेदवारास मतं देणार नाहीत, हा समज. आम्ही तो देखील दूर केला आणि ओबामा यांना प्रचंड आघाडी मिळाली. सुरूवातीला हे तंत्र ओबामा यांच्या हिलरी विरोधातील निवडणुकांत वापरलं गेलं आणि नंतर अध्यक्षीय निवडणुकांत.

अँड्रय़ू या तंत्राचं श्रेय पूर्णपणे ओबामा यांच्या शास्त्रीय मानसिकतेला देतो. ओबामा यांचा स्वतचा शास्त्रावर विश्वास आहे. त्याचमुळे त्यांच्या आसपासचे सहकारीही तसेच होते. कोणी अभियंता कोणी जीवशास्त्रज्ञ वगरे. डेव्हिड प्लॉफ आणि अँड्रय़ू हे यातनंच त्यांच्या जवळ आले. दोघेही मुळचे तंत्रज्ञ आणि संबंधित क्षेत्रात काम करणारे. या शस्त्राचा असा काही विकास त्यांनी केला की अमेरिकेत आजही निवडणुका म्हटल्या की या दोघांचा विषय निघतोच निघतो. डेव्हिड या निवडणुकांचं माध्यमांत विश्लेषण करतात. तर अँड्रय़ू खासगी कंपन्या, अन्य देशांतील राजकीय पक्ष यांच्यासाठी स्वतंत्र प्रारूप आखायचं काम करतो. तो आता याच कामासाठी मलेशियाच्या वाटेवर होता. म्हणून भेटीसाठी विमानतळ कक्ष. पण मुद्दा असा की डेमोक्रॅटिक पक्ष इतकं सारं करत असताना रिपब्लिकन उमेदवार काय करत होते?

रिपब्लिकन पक्षाच्या तीन अध्यक्षीय उमेदवारांनी हे असं काही करायला नकार दिला. जॉन मकेन, मित रॉम्नी आणि तिसरे डोनाल्ड ट्रम्प. यातले पहिले दोघेही हरले. तिसऱ्याचंही तसंच होईल?

अँड्रय़ूच्या मते तशी शक्यता दाट आहे. याचं कारण कोणत्याही शास्त्रीय पाहणी वगरेला ट्रम्प यांचा विरोध आहे. किंबहुना त्यांचा सगळाच दृष्टिकोन शास्त्रदृष्ट आहे. त्यामुळे विश्लेषण, पूर्व तयारी वगरे काहीही बाबी त्यांना मान्य नाहीत. या उलट हिलरींचं काम पूर्णपणे ओबामा प्रारूपावर सुरू आहे. आता पुढच्या आठवडय़ात समस्त ओबामा कुटुंबीय, क्लिंटन कुटुंबीय याच प्रारूपानुसार थेट मतदार संपर्काच्या मोहिमेवर निघतील. याच प्रारूपाच्या आधारे पहिल्या अध्यक्षीय वादफेरीत क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्या वर्मावर घाव घातला. त्याचा परिणाम निश्चित झालाय. ऑगस्टपर्यंत हिलरी आघाडीवर होत्या. नंतर त्यांच्या शिडातली हवा जरा कमी झाली. उरलेल्या दोन अध्यक्षीय चर्चात त्यांचा अविर्भाव असाच राहिला तर त्या पुन्हा आघाडी घेतील.

शेवट अर्थातच भारतातल्या २०१४ सालच्या निवडणूक मुद्यावर झाला. या निवडणुकांत नरेंद्र मोदी यांना निश्चितच आघाडी होती. परंतु काँग्रेसनं अथवा विरोधकांनी शास्त्रशुद्ध मार्ग अंगिकारला असता तर त्यांचं इतकं पानिपत होतं ना आणि मोदी यांना इतकी आघाडी मिळती ना.. असं अँड्रय़ू याचं मत आहे. ते तो आकडेवारीच्या आधारे मानतो. आताही मोदी सरकार अनेक आघाडय़ांवर घसरत असताना विरोधक पारंपारिक पद्धतीनंच राजकारण करतायत. पक्षीय धोरणं, वातावरण, राजकारण वगरे सगळं ठीक आहे. पण मतदारांना त्या पलीकडे जाऊन जिंकता येतं.. इतकंच काय विरोधी मतदारांनाही काही प्रमाणात आपल्याकडे वळवता येतं.. असा त्याचा विश्वास आहे. निवडणुका या थंड डोक्यानं, गणितं करतं जिंकता येतात.. त्यासाठी भावनांचा आधार लागतोच असं अजिबात नाही.. अगदी बिहारसारख्या राज्यातदेखील ही पद्धत यशस्वी होऊ शकते, तो सांगतो. अँड्रय़ू अनेकदा भारतात आलाय. येतोही. दोन संस्थांसाठी तो काम करतो. त्याला भारतातलं राजकारण चांगलं माहितीये. भारतीय राजकारणाला तो आणि त्याचं शास्त्र माहितीये का, हा प्रश्न आहे.

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter : @girishkuber