देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ असा लौकिक असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) मध्ये पुन्हा एकदा विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली. गुरुवारीच हा धक्कादायक प्रकार घडला. आधी या विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली आणि त्यानंतर तिला मारहाणही करण्यात आली अशी माहिती समोर येते आहे. जशी ही गोष्टी विद्यापीठात समजली तसा एकच गोंधळ उडाला. पीडित मुलीने जवळच्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

छेडछाड झालेली पीडित विद्यार्थिनी समाजशास्त्र विषयात एम. ए. करते आहे. शीतला शरण गौड हा विद्यार्थी तिच्याच वर्गात शिकतो. याच विद्यार्थ्याने छेड काढून मारहाण केल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली. शीतला शरण गौडने आपल्याला वर्गाच्या बाहेरून जात असताना  जवळ खेचले,  मी त्याला अडवले तर त्याने माझा मोबाईल जमिनीवर फेकला आणि मला थोबाडीत मारून माझे केस ओढले असे तक्रारीत पीडित मुलीने म्हटले आहे.

सप्टेंबर महिन्यात बीएचयूमध्ये झालेल्या छेडछाड प्रकरणानंतर आंदोलन झाले होते. या आंदोलनात विद्यार्थिनींचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य रेखा शर्मा यांनी बीएचयूमध्ये आल्या होत्या. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. २४ सप्टेंबरला झालेल्या प्रकरणानंतर पुन्हा छेडछाडीची घटना घडल्यामुळे या विद्यापीठातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरूवारी झालेल्या या प्रकारानंतर नेटिझन्सनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. ट्विटरवर पीडित मुलीला पाठिंबा दिला आहे तर अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याला कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी करण्यात येते आहे.