शरीरसंबंधासाठी संमतीची वयोमर्यादा १८ वरून १६ करण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता रोहटकमधील खाप पंचायतीने महिलांचे विवाहाचे वय १८ वरून १६ करण्याची मागणी केलीये. हरियाणातील विविध गावांमधील पंचायतीचे सदस्य या खाप पंचायतीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामध्ये विवाहाचे वय कमी करण्याची मागणी करण्यात आली.
विवाहाशिवाय कोणत्याही महिलेने शरीरसंबंध ठेवणे, हे समाजासाठी घातक असल्याचा ठराव खाप पंचायतीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकाचा या बैठकीत विरोध करण्यात आला. केंद्र सरकारने एकतर महिलांचे विवाहासाठीचे वय १८ वरून आता १६ करावे, नाहीतर नुकतेच मंजूर केलेले विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी खाप पंचायतीमध्ये करण्यात आली. रोहटक गावाचे प्रमुख रणधीरसिंग यांनी याबाबत माहिती दिली.
एखाद्या मुलीने वयाच्या १६व्या वर्षी परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवले आणि त्यानंतर १८ व्या वर्षी विवाह केल्यास त्यातून वाईट प्रथा समाजात जन्म घेतील. शरीरसंबंधानंतर संबंधित मुलीला अपत्य झाल्यास तिला आयुष्यात पुढे कोणाबरोबरही विवाह करताना असंख्य अडचणी उभ्या राहतील. जर परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवण्याचे वय १६ करण्यात केंद्र सरकारला काहीही गैर वाटत नसेल, तर त्यांनी विवाहाचे वयही १८ वरून १६ करण्यात काहीही गैर मानू नये, असे सुबेसिंग यांनी म्हटले आहे.