राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी (३० जानेवारी) त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेवर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. गोवा फॉरवर्ड पार्टी नावाच्या संघटनेने या कार्यक्रमास देशद्रोह संबोधले आहे. ‘नथुराम गोडसे – दी स्टोरी ऑफ अॅन असॅसिन’ नावाचे हे पुस्तक अनुप अशोक सरदेसाई यांनी लिहिले आहे. रविंद्र भवन या सरकारी वास्तुत पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजप नेता आणि भवनाचे संचालक दामोदर नाईक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हा सोहळा म्हणजे देशद्रोह असून, या कार्यक्रमासाठी सरकारी भवनाच्या वापरास मज्जाव करणे गरजेचे असल्याचे मत गोवा फॉरवर्ड पार्टीचे सचिव मोहनदास लोलाइनकर यांनी व्यक्त केले. सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन होऊ दिल्यास रविंद्र भवनासमोर सत्याग्रह करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वारापाशी उभे राहून उपस्थितांना प्रवेश करण्यास मज्जाव करतील. तसेच अतिशय शांतपणे निदर्शने करत विरोध दर्शविला जाणार असल्याची माहिती लोलाइनकर यांनी दिली.