काही जोडपी आणि सुट्टी साजरी करण्यासाठी गोव्यात आलेले लोक जाहीरपणे चुंबन घेण्यासारखे ‘अश्लील कृत्य’ करत असल्याने स्थानिक रहिवाशांना उपद्रव होत असल्याचे सांगून, गोव्यातील एका ग्रामपंचायतीने सार्वजनिकरीत्या चुंबन घेण्यावर बंदी घातली आहे.
पणजीनजिकच्या साल्व्हाडोर डो मुंडो ग्रामपंचायतीने अलीकडेच एक ठराव पारित करून सार्वजनिक स्थळी चुंबन घेणे व दारू पिणे, तसेच फार मोठय़ाने संगीत वाजवणे या बाबींवर बंदी घातली आहे.
काही जोडपी व पर्यटकांच्या अश्लील वर्तणुकीबद्दल स्थानिकांनी आमच्याकडे अनेक तक्रारी केल्यामुळे यावर नियंत्रण आणणे आम्हाला भाग पडले. त्यामुळे आम्ही असा ठराव केला, असे या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रीना फर्नाडिस यांनी सांगितले. या ठरावाचे पालन करण्यासाठी सहकार्य करावे, अशा आशयाचे फलक ग्रामपंचायतीने सर्वत्र लावले आहेत.