गुजरातमध्ये २००२साली झालेल्या जातीय दंगलींची सर्वाधिक झळ सहन करावे लागलेले गोध्रा शहर आता एका नव्या कारणासाठी ओळखले जाण्याची शक्यता आहे. गुजरातसह देशभरात नवरात्रौत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर खेळण्यात येणारा दांडिया गोध्रा शहरातील अनेक मुस्लिम कुटुंबाच्या उपजीविकेचा आधार बनला आहे. नवरात्रीच्या साधारण पाच-सहा महिने आधी या भागातील मुस्लिम दांडिया बनविण्याचे काम सुरू करतात. आंबा आणि बवाल वृक्षाच्या लाकडापासून दांडिया तयार करणे, त्यांच्यावर रंगरंगोटी आणि सजावट करण्याच्या कामामुळे गोध्रा भागातील अनेकजणांचा उदरनिर्वाह चालत असल्याची माहिती व्यावसायिक रफीकभाई अब्दुलभाई मेंडा यांनी दिली. दांडियांची रंगरंगोटी आणि सजावट करण्याच्या कामाला ‘खराडीकाम’ म्हणून संबोधले जाते. हेच ‘खराडीकाम’ गोध्रातील तब्बल ५०० मुस्लिम कुटुंबांच्या रोजगाराचे साधन बनले असून, या उत्सवातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या दांडिया तयार काम त्यांना आनंद देत असल्याचेही रफीकभाईंनी सांगितले. गोध्रा परिसरातील पोलन बाजार, सुलतानपुरा, मधु लॉट, बिलादिया प्लॉट, अहमदनगर भागात दांडिया बनवण्याचे तब्बल ३०० कारखाने असून, यापैकी बहुतांश कारखान्यांचे मालक मुस्लिम आहेत. या दांडियांना गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून प्रचंड मागणी असते.