नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांचा खून करण्याऐवजी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा खून करायला पाहिजे होता,  असे अप्रत्यक्ष मत केरळमधील ‘केसरी’ या संघाच्या मुखपत्रात भाजप नेते बी. गोपाळकृष्णन यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान केरळमध्ये काँग्रेसने यावर तीव्र नापसंती व्यक्त केली असून केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सूरानंद राजशेखरन यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्नीथाला यांनी पोलीस महासंचालक के. एस. बालसुब्रम्हण्यम यांना  कारवाई करण्यास सांगितले आहे. यातून संघ व भाजपचा विखारी चेहरा उघड झाला आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. दरम्यान केसरी या साप्ताहिकाच्या संपादकांनी लेखातील मत योग्य असल्याचे म्हटले असून काँग्रेसचे आरोप फेटाळले आहेत.

गोपाळकृष्णन यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर पराभव झालेला असून त्यांनी या लेखात म्हटले आहे की, नेहरू हे स्वार्थी होते व देशापुढे आज सात दशकांनंतरही जे प्रश्न आहेत त्याला तेच जबाबदार आहेत. नेहरू यांनी ब्रिटिशांशी चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात गांधींना संपवून टाकले. नेहरूंना गांधींची खादी व टोपी हे काँग्रेसचे प्रतीक म्हणून हवे होते. स्वातंत्र्यानंतर आता काँग्रेसची भूमिका संपली आहे असे जेव्हा गांधी म्हणाले तेव्हा नेहरूंनी त्यांची कुचेष्टा केली होती. नेहरूंनी फाळणीच्या वेळी अनेक गोष्टी गांधीजींपासून लपवून ठेवल्या व त्यांना ब्रिटिशांशी चर्चेच्या शेवटच्या फेरीत बाजूला ठेवले.

केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व्ही. एम. सुधीरन यांनी सांगितले की, संघ परिवार इतिहासाचा विपर्यास करीत असून नेहरूंचे चारित्र्यहनन करीत आहे. केसरी या साप्ताहिकाचे संपादक एन. आर. मधू यांनी सांगितले की, काँग्रेस नेत्यांनीच राजकीय हेतूने वस्तुस्थितीचा विपर्यास केला. आम्ही नेहरूंच्या धोरणांवर प्रथमच टीका केलेली नाही. ही काँग्रेसची खेळी असून माकपपेक्षाही आता भाजप व रा. स्व. संघ काँग्रेसच्या डोळ्यात सलत आहेत.

विश्लेषण : ‘गोडसे’ उदात्तीकरण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

संघाकडून लेखाचा निषेध

रा.स्व.संघाचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी या वादग्रस्त लेखाचा निषेध केला असून ती लेखकाची व्यक्तीगत मते असल्याचे म्हटले आहे. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी केसरी या मल्याळी मुखपत्रात हा लेख प्रसिद्ध झाला होता. रा.स्व संघाने नेहमीच हिंसेला विरोध केला असून या लेखाशी संघाचा काही संबंध नाही असे त्यांनी सांगितले.

गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…

गोपाळकृष्णन नेमके काय म्हणतात..

या लेखात गोपाळकृष्णन यांनी असे म्हटले आहे की, जर इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे देशाच्या फाळणीपूर्वीच्या तथ्यांचा अभ्यास केला व नथुराम गोडसे याची मते पाहिली तर ते या निष्कर्षांप्रत येतील की, गोडसे याने चुकीचे लक्ष्य निवडले.’ या वाक्याचा अप्रत्यक्ष अर्थ लेखातील इतर बाबींच्या आधारे असा होतो की, नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांच्याऐवजी जवाहरलाल नेहरू यांचा खून करायला हवा होता.