सोशल मिडीयाचा अतिशय खुबीने वापर करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकारणाप्रमाणे आता ट्विटरवर देखील लाट निर्माण झाली असून सर्वाधिक रिट्विटचा ‘गोल्डन ट्विट’ किताब लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर मोदींनी केलेल्या ट्विटला मिळाला आहे.
वर्षभरातील सर्वाधिक रिट्विटसाठी हा पुरस्कार दिला जातो.  लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदींनी  ‘India has won! भारत की जय! अच्छे दिन आनेवाले है’ असे ट्विट केले होते, जे ७० हजारांपेक्षा जास्तवेळा रिट्विट करण्यात आले. त्यामुळेच मोदींच्या ट्विटला ‘गोल्डन ट्वीट २०१४’ हा किताब मिळाला आहे. वर्षाच्या अखेरीस ट्विटरकडून २०१४ इयर ऑन ट्विटर हा अहवाल घेण्यात आला. या अहवालात मोदींचाच दबदबा असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीत मोदींची ट्विटरवरील लोकप्रियता प्रचंड वाढली आणि वर्षभरात फॉलोअर्स वाढविण्याचाही विक्रमाची नोंद मोदींच्या नावावर आहे. यंदा वर्षभरात मोदींच्या ट्विटर अकाऊंटला ४६ लाख २९ हजार ट्विटरकर फॉलो करू लागले. देशातील सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱया ट्विटर अकाऊंट यादीत मोदी पाचव्या क्रमांवर आहेत.