गुगलने ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथी हॉजकिन यांचा जन्मदिन डुडलच्या माध्यमातून होमपेजवर साजरा केला आहे.  हॉजकिन यांचा जन्म १२ मे १९१० रोजी झाला होता व त्यांना बी १२ या जीवनसत्त्वाची स्फटिक रचना शोधून काढल्याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. नोबेल मिळालेल्या त्या तिसऱ्या महिला होत्या. क्ष-किरण स्फटिकशास्त्र तंत्राच्या मदतीने त्यांनी बी १२ जीवनसत्त्वाची रचना शोधून काढली. १९४६ मध्ये त्यांनी पेनिसिलीनच्या रचनेवर प्रकाश टाकला त्यासाठी त्यांनी हॉजकिन प्रारूपाचा वापर केला होता. हे प्रारूप लंडनच्या विज्ञान संग्रहालयात ठेवलेले आहे. ब्रिटनमधील पहिल्या दहा वैज्ञानिक महिलांमध्ये कॅरोलिन हर्शेल, मेरी सॉमरव्हिले, मेरी अ‍ॅनिंग, एलिझाबेथ गॅरेट अँडरसन, हेरथा आयर्टन, कॅथलिन लॉन्सडेल, एल्सी विडोसन, डोरोथी हॉजकिन, रोसलिंड फ्रँकलिन व अ‍ॅनी मॅकलॅरेन यांचा समावेश होता. डोरोथी मेरी क्रोफूट नंतरच्या हॉजकिन यांचा जन्म ईजिप्तमध्ये झाला होता त्यांचे बालपण ब्रिटनमध्ये गेले. त्यांना तारुण्यातच स्फटिकांचे आकर्षण होते. सोळाव्या वाढदिवशी त्यांना एक पुस्तक भेट मिळाले त्यातून त्यांना स्फटिकशास्त्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. स्फटिकशास्त्रात त्यांनी १९३२ मध्ये ऑक्सफर्डमधून पदवी घेतली.

त्यांना बी१२ जीवनसत्त्वाचे संशोधन करण्यास आठ वर्षे लागली व त्यासाठी त्यांना नोबेल मिळाले. १९३७ मध्ये त्यांचा विवाह प्राध्यापक थॉमस लिओनेल हॉजकिन या प्राध्यापकाशी झाला. हॉजकिन या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य होत्या. १९५३ मध्ये त्यांच्यावर अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली नंतर ती उठवली गेली. त्यांना लेनिन शांतता पुरस्कार मिळाला होता.