इंटरनेट वापरासाठी सक्षम ‘अ‍ॅन्ड्रॉइड वन’ हा मोबाइल अवघ्या ६ हजार ३९९ रुपयांत ‘गुगल’ने सोमवारी भारतीय बाजारपेठेत आणला आहे. उत्तम दर्जाचे सॉफ्टवेअर आणि कमी किमतीतील स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘गुगल’नेही उडी घेतली आहे.
गुगल ऑपरेटिंग सिस्टिमने सज्ज केलेले हॅण्डसेट ‘मायक्रोमॅक्स’, ‘कार्बन मोबाइल्स इंडिया’ आणि ‘स्पाइस मोबिलिटी’ने तयार केले आहेत. ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’, ‘फ्लिपकार्ट’ आणि स्नॅपडीलवर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
‘मीडिया टेक क्वाड-कोअर प्रोसेसर’ आणि ४.५ इंचांचा स्क्रीन ही या स्मार्टफोनमधील महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने गुगलने हॅण्डसेट निर्मात्यांचा संदर्भ असलेली एक चौकट दिली आहे. सध्या भारतीय बाजारपेठेतील अनेक किफायतशीर स्मार्टफोनमध्ये अ‍ॅण्ड्राइड ऑपरेटिंग सिस्टमची ग्राहकाभिमुख आवृत्त्या सादर केल्या आहेत.
‘अ‍ॅण्ड्राइड वन’ संदर्भातील ऑपरेटिंग सिस्टम ही गुगलने विकसित केली आहे. अर्थात यावर गुगलचे उत्तम नियंत्रण राहणार असून ग्राहकांना खात्रीशीर, सातत्यपूर्ण सेवा देण्याचा कंपनीचा उद्देश सफल होणार असल्याचे मत गुगल व्यवस्थापनाने म्हटले आहे. येत्या काही दिवसांत भारतातील ग्राहकांना यू टय़ूबवरील व्हिडीओ ऑफलाइन पाहता येतील, असेही गुगलने स्पष्ट केले. येत्या २०१७ पर्यंत भारत इंटरनेट बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाचा देश होईल, अशी अपेक्षा कॅलिफोर्नियास्थित ‘माऊंटन व्ह्य़ू’ या कंपनीचे वरिष्ठ व्हाइस प्रेसिडेंट सुंदर पिचाई यांनी सांगितले. भारत पहिलाच देश आहे की जिथे प्रथम गुगलचा ‘अ‍ॅण्ड्रॉइड वन’ फोन बाजारात आणला जात आहे. येत्या काही महिन्यांत तो इंडोनेशिया, फिलिपाइन्स, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेत आणला जाईल.
यूटय़ूब व्हिडीओ ऑफलाइन होणार
‘अ‍ॅण्ड्रॉइड वन’ फोन भारतीय बाजारपेठेत सादर केल्यानंतर आता गुगलने ‘यूटय़ूब’वरील व्हिडीओ ‘ऑफलाइन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. दर्शकांना ‘यूटय़ूब’वरून हे व्हिडीओ डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र हे आवडते व्हिडीओ पाहण्यासाठी ग्राहकांना काही पैसे मोजावे लागणार आहेत. येत्या काही आठवडय़ांत ही ‘यूटय़ूब’ची सेवा उपलब्ध झाल्यानंतर दर्शक हवे असलेले व्हिडीओ डाऊनलोड करू शकतील. त्यासाठी पुन्हा यूटय़ूबची ऑनलाइन सेवा घेण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती गुगलचे उपाध्यक्ष (उत्पादन व्यवस्थापन) सीझर सेनगुप्ता यांनी सांगितले.
मोफत डाटासाठी ‘एअरटेल’शी भागीदार म्हणून करार करण्यात आला आहे. यासाठी ग्राहकांना किमतीसाठी विविध पर्याय ठेवण्यात आला आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि ४ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता असेल. ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येईल. ५ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. यात बदली करता येण्याजोगी बॅटरी आहे. याशिवाय रेडिओची सुविधा असेल.