गुगलकडून ‘अँड्रॉईड ओ’ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीमचे लाँच करण्यात आले आहे. अँड्रॉईडच्या आत्तापर्यंतच्या सिस्टीम्सना खाद्यपदार्थांची नावे देण्यात आली आहेत. त्याच पद्धतीनुसार या सिस्टीमला ‘ओरियो’ नाव देण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी ‘अँड्रॉईड ओ’चे लाँचिंग करण्यात आले. गुगलकडून लॉन्च करण्यात आलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

अँड्रॉईड ओ या सिस्टीममध्ये ‘पिक्चर-इन-पिक्चर मोड’ आणि नोटिफिकेशन डॉट अशी फिचर्स असणार आहेत. पिक्चर इन पिक्चर मोडद्वारे आयकॉनच्या डिझाईनमध्ये बदल करता येणार आहेत. याशिवाय नवे इमोजीही उपलब्ध होणार आहेत. तसेच या मोडमध्ये दोन युझर्स एकाचवेळी एक अॅप वापरू शकणार आहेत.

नोटिफिकेशन डॉटच्या सुविधेमुळे अॅपच्या आयकॉनवर टॅप केल्यानंतर लगेचच नोटिफिकेशनची झलक पाहता येणार आहे. उत्तम बॅटरी लाईफ, उत्कृष्ट नोटिफिकेशन सिस्टीम, वायरलेस ऑडिओ फिचर्स हे देखील अँड्रॉईड ओ मध्ये असणार आहेत, अशीही माहिती समोर येते आहे.