उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत ६३ जण दगावले आहेत. आज, शनिवारी एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारनं या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा खंडित करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स या कंपनीने याबाबत पत्रव्यवहार करून थकीत बिलाची माहिती दिली होती. कंपनीचे एकूण ६८,५८,५९६ रुपये रुग्णालयाकडे थकले आहेत. थकीत बिल चुकवले नाही तर कंपनीकडून केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही कंपनीने पत्राद्वारे दिला होता, अशी माहिती समोर आली आहे.

महिनाभरापासून रुग्णालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत स्थानिक वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध होत होते. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांना त्याबाबत काहीच माहिती नव्हती, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. त्यानंतरही ही घटना घडली. यावरून आता विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह सरकारला घेरले आहे. या घटनेला सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासाठी ही घटना शरमेची बाब आहे. थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणी बसपने केली आहे. तर सरकारने मृत बालकांच्या कुटुंबीयांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी. सरकारने गरीब रुग्णांना मोफत आणि मुबलक प्रमाणात औषधांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही गोरखपूर येथे रुग्णालयात जाऊन मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या शिष्टमंडळात गुलाम नबी आझाद आणि राज बब्बर यांचा समावेश आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या घटनेवरून राजकारण करू नये. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री के. पी. मौर्य यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी मनिष तिवारी यांनी केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.