गोरखपूर य़ेथिल बाबा राघवदास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी झालेल्या बालमृत्यूंच्या घटनेतील एका मृत बालकाच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आहे. उत्तरप्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. गोरखपूर दुर्घटनेप्रकरणी ही पहिलीच तक्रार आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पोलिस स्थानकाबाहेर मृत बालकाच्या पालकांनी आंदोलनही केले.


मृत बालकाचे वडिल राजभर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ते बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी आहेत. आपला मुलगा आजारी असल्याने त्यांनी १० ऑगस्ट रोजी त्याला उत्तर प्रदेशातील बीआरडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते.

राजभर यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, ऑक्सिजनचा पुरवठा रोखण्यात आल्याने माझ्या मुलाचा बीआरडी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांनी आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, वैद्यकीय शिक्षण मंत्री अशुतोह टंडन आणि मुख्य सचिव प्रशांत त्रिवेदी यांच्यावर या प्रकरणी आरोप करीत तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर या मुलांच्या मृत्यूनंतर त्यांचे पोस्टमॉर्टमही करण्यात आले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. १४ ऑगस्ट रोजी त्यांनी पोलिसांत ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेसाठी रुग्णालयाचे प्रमुख राजीव मिश्रा यांच्यावर ठपका ठेवला असून कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

७० पेक्षा अधिक जणांचे बळी घेणाऱ्या गोरखपूर दुर्घटनेसाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने प्रायश्चित घेतले पाहिजे, अशी भूमिका भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतेच म्हटले आहे. योगी सरकार या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी टाळू शकत नाही, असे उत्तर प्रदेशातील संघाच्या पदाधिकारी म्हणाले.

या दुर्घटनेप्रकरणी रुग्णालयातील डॉ. काफील खान आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रचार्य राजीव मिश्रा यांना जबाबदार धरण्यात आले आहे. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे. तर त्यांच्या या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्रचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.