ग्राहकांचे संरक्षण हा आमच्या सरकारचा प्रधान्यक्रम असून ग्राहकाच्या हितासाठी अधिक कडक नवा ग्राहक संरक्षण कायदा आणण्याची तयारी सुरु असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पूर्व, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांच्या ग्राहक संरक्षण आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, ‘आम्ही नवे ग्राहक संरक्षण प्राधिकरण आणण्याच्या तयारीत आहोत. या प्राधिकरणाला तत्काळ तक्रार निवारणासाठी विशेष अधिकार असणार आहेत. या प्राधिकरणांतर्गत तयार करण्यात येणारे नियमांद्वारे ग्राहकांच्या अडचणी कमी वेळात आणि कमी खर्चात सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ग्राहकांच्या सक्षमीकरणासाठी या कायद्यावर अधिक जोर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहीरातींवर कडक कारवाईची यात तरतूद असणार आहे.’

ग्राहकांच्या संरक्षणासाठी १९८६ मध्ये तत्कालिन संयुक्त राष्ट्रसंघाने आणलेल्या मार्गदर्शकतत्वांनंतर पुढच्याच वर्षी ग्राहकांसाठी स्वतंत्र कायदा करणाऱ्या काही मोजक्याच देशांपैकी भारत एक असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीमुळे वस्तूंच्या किंमतीत घट होऊन ग्राहकांचे हित प्रभाविपणे संरक्षित केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जीएसटीमुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढणार असून त्यामुळे किंमती कमी होणार आहेत. याचा फायदा कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरिबांना होईल असेही मोदी यावेळी म्हणाले.

जीएसटी लागू झाल्यामुळे राज्यांच्या सीमांवर विविध करांच्या वसूलीसाठी उभारण्यात आलेले चेकपोस्ट बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना रांगा लावून थांबावे लागत असल्याने यापूर्वी पाच दिवस लागायचे ते आता तीन दिवसांत पोहोचतील. यामुळे वाहतुकीच्या खर्चात कपात होणार आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकालाच होणार असल्याचे मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी जीएसटीवर टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, ज्यांना जीएसटीची प्रक्रिया माहिती नाही, अशा लोकांचा हे टीकाकार फायदा घेत आहेत. या निर्णयाद्वारे आम्ही देशातील नागिरिकांच्या गरजांची गांभीर्याने दखल घेतल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
भारतात घेण्यात आलेली ही पहिलीच परिषद असून यामध्ये प्रत्येक देश आपल्यापरीने ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, जग आता एकल बाजाराच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.