महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाइल फोनमध्ये संकटनिवारक बटणाची सोय करण्याचा सरकारचा विचार आहे. संकटात असताना या मोबाइलवरील हे बटन दाबल्यास महिलांना मदत मिळू शकेल, असे महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सांगितले. मोबाइल उत्पादन करतानाच असे बटण  (एसओएस- सेव्ह अवर सोल्स) त्यात समाविष्ट करण्यासाठी सरकार कंपन्यांशी विचारविनिमय करीत आहे.

संकटात असल्याचा संदेश हे बटण दाबल्यास महिलांना मदत मिळू शकेल. आतापर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी नेकलेस, ब्रेसलेट व रिंग्ज अशा अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. या साधनांतील यंत्रामधून महिला संकटात असल्याचा संदेश पाठवला जाऊ शकतो, पण आपल्याला असे करण्याची वेळ का यावी. महिला या काय कैदी आहेत काय, ज्यांनी अंगावर ही साधने बाळगावी. या साधनांची उपलब्धता, वापर तसेच किफायतशीरपणा या गोष्टींचा विचार करून ग्रामीण महिलांसाठी साधने उपलब्ध करता येणार नाहीत का, असा प्रश्न त्यांनी विद्यार्थी संसदेत मुलांपुढे उपस्थित केला.

आहे तिथे मदत..

या उपकरणांना मर्यादा आहेत व सरकारने मोबाइलमध्येच असे बटण ठेवण्याची कल्पना मांडली आहे. ते बटण दाबताच जीपीएस कार्यान्वित होईल व महिलेला ती आहे तिथे मदत मिळेल. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याची अ‍ॅप्स आहेत पण ती वापरताना खूप वेळ जातो. मोबाइलमध्येच तसे बटण असेल तर महिलांना लवकर मदत मिळेल.