स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील चिनी कंपन्यांना केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे. स्मार्टफोन्सच्या माध्यमातून चिनी कंपन्यांकडून भारतीय ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळेच ओप्पो, शाओमी, विवो, जियोनी यांच्यासह सर्वच चिनी कंपन्यांना सरकारने नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

स्मार्टफोन क्षेत्रातील बऱ्याचशा कंपन्या चीनमधील आहेत. त्यामुळेच या कंपन्यांकडून भारतीय ग्राहकांची माहिती हॅक केली जात असल्याचा संशय सरकारला आहे. भारतातील कोट्यवधी लोक स्मार्टफोनचा वापर करतात. अॅपल, सॅमसंग, मायक्रोमॅक्स अशा काही मोजक्या कंपन्यांचा अपवाद वगळल्यास स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील बहुतांश कंपन्या चीनमधील आहेत. या कंपन्या त्यांच्या भारतीय ग्राहकांच्या फोनमधील मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक करतात, असा संशय सरकारला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

चिनी कंपन्यांसोबतच इतरही कंपन्यांना सरकारने नोटीस पाठवली आहे. यामध्ये अमेरिकेतील अॅपल, दक्षिण कोरियातील सॅमसंग आणि भारतातील मायक्रोमॅक्सचा समावेश आहे. केवळ चिनी कंपन्यांना नोटीस पाठवणे योग्य नसल्याने इतरही कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने एकूण २१ कंपन्यांना नोटीस बजावली आहे. ‘सुरक्षा निकषांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना २८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याबद्दलची पडताळणी करण्यासाठी ऑडिटदेखील केले जाऊ शकते,’ अशी माहिती ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने माहिती आणि तंत्रज्ञान खात्यातील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. एखाद्या कंपनीकडून निकषांचे उल्लंघन केले जात असल्यास संबंधित कंपनीविरोधात कारवाई करुन दंड वसूल केला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

याआधी चीनकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची आयात होत असल्याचे वृत्त होते. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) चीनमधून भारतात केली जाणारी आयात ३३ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सिक्किम सीमेवरील डोक्लाममध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. मात्र याच काळात दोन्ही देशांमधील व्यापारात मोठी वाढ झाली आहे. भारताने गेल्या तीन महिन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी सामग्री आणि रसायनांची आयात केली आहे.