रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची निर्मिती करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप असेल, अशी चर्चा होती. मात्र ही चर्चा चुकीची आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. ५०० आणि हजाराच्या नोटा बंद केल्यानंतर बुधवारी जेटली यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.

मोदी सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत जेटली यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात काळ्या पैशांची समांतर अर्थव्यवस्था होती. त्यावर अंकुश लावण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी सरकारनं हा धाडसी निर्णय घेतला, असं जेटली यांनी सांगितलं. उद्या (गुरुवार) सकाळपासून नव्या नोटा चलनात येतील. सरकारने नोटांवरील बंदीच्या घेतलेल्या निर्णयामुळं मोठ्या प्रमाणात कर जमा होईल, अशी आशा आहे. तसंच देशाने कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकलेले आहे, असंही जेटली म्हणाले.

५०० आणि हजाराच्या नोटा बंद केल्यानं केंद्रासह सर्व राज्यांनाही फायदा होईल. सर्वसामान्य नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. फक्त काही दिवसांसाठीच अडचणी निर्माण होतील, असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाची १९७८ मध्ये जनता पक्षानं घेतलेल्या निर्णयाशी तुलना होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काळ्या पैशांबाबत विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आलं आहे. तसंच सरकारनं बेनामी संपत्तीबाबतही कायदा आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार केला होता. त्यानुसार सरकारनं हा निर्णय घेतला आहे, असंही जेटली यांनी सांगितलं.