केंद्र सरकार कोणत्याही शालेय पाठ्यपुस्तकांमधून रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीचा मजकूर वगळणार नाही, असे आश्वासन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. ते मंगळवारी राज्यसभेत बोलत होते. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी जावडेकर यांनी म्हटले की, रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांविषयी व त्यांच्या साहित्याविषयी सरकारला आदर आहे. आम्हाला या प्रत्येकाचेच कौतुक आहे. त्यामुळे कोणताही मजकूर शालेय पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात येणार नाही, असे जावडेकर यांनी सांगितले.

‘एनसीईआरटी’कडून अभ्यासक्रमात बदल करण्याच्यादृष्टीने देशभरातून सूचना मागवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या दीनानाथ बात्रा यांच्या अध्यक्षतेखालील संस्कृती उत्थान न्यासाकडून एनसीआरटीला तब्बल पाच पानी सूचनापत्र पाठवण्यात आले होते. यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमधून इंग्रजी, हिंदी आणि फारसी शब्द काढून टाकावेत, अशा सूचना समितीला करण्यात आल्या होत्या. याशिवाय, क्रांतिकारी कवी पाश, गालिब यांचे शेर , रवींद्रनाथ टागोर यांचे वैचारिक लेख, चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या आत्मचरित्रामधील निवडक भाग, मुगल राजांची थोरवी सांगणाऱ्या गोष्टी, भाजपचा हिंदू पक्ष म्हणून असलेला उल्लेख, काँग्रेस पक्ष निधर्मी असल्याचा उल्लेख, शीख दंगलीविषयी मनमोहन सिंग यांनी मागितलेली माफी आणि २००२ सालच्या गुजरात दंगलीचा उल्लेख या गोष्टी ‘टाकाऊ’ असल्याचे संस्कृती उत्थान न्यासाने म्हटले होते.

याबद्दल बोलताना न्यासाचे सचिव अतुल कोठारी यांनी म्हटले की, सध्याच्या पाठ्यपुस्तकांमधील अनेक गोष्टी निराधार आणि पक्षपाती आहेत. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना चुकीच्या लोकांची महती सांगून त्यांची दिशाभूल कशी काय करू शकता?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरूषांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती नाही. त्यामुळे एनसीआरटी आम्ही पाठवलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करेल, असा विश्वास कोठारी यांनी व्यक्त केला होता.