देशातील काही मदरशांमध्ये परदेशी शिक्षक असून ते तरुण विद्यार्थ्यांना जिहादी विचारसरणीचे शिक्षण देत असल्याचा संशय असल्याने काही मदरशांमधील कारवाईवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. काही मदरशांमधील प्रत्येक हालचालींवर आमचे बारकाईने लक्ष आहे. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे काही बांगलादेशी नागरिक विद्यार्थ्यांना शिकवण देत आहेत, असे वृत्त आल्याच्या पाश्र्वभूमीवर राजनाथ सिंह बोलत होते.
मांझी यांच्या वक्तव्यावर स्वपक्षातूनच टीका
पीटीआय, पाटणा
सवर्ण हे परदेशी नागरिक आहेत, या बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या वक्तव्यावरून पक्षातूनच जोरदार वादंग निर्माण झाला आहे. जद (यू)चे आमदार अनंत सिंह यांनी मांझी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.एकीकडे पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच दुसरीकडे मात्र पक्षाने मांझी यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शविली आहे. अनंत सिंह यांनी मांझी यांच्यावर टीका करताना त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे म्हटले आहे. मांझी यांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्ये केली असल्याने सत्तारूढ पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे मांझी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी अनंत सिंह यांनी केली आहे.जद(यू)चे आमदार आणि नितीशकुमार यांचे समर्थक संजय झा यांनी, मांझी यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. सवर्णाना परदेशी संबोधून मांझी यांनी या वर्गाचा देशाच्या उभारणीतील सहभागच नाकारला आहे, असे मतही व्यक्त केले जात आहे.