राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर जोरदार हल्ला चढवला. काश्मीरमधील ज्या फुटीरतावादी नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या घोषणा द्यावाशा वाटतात, त्यांना भारतीय भूमीवर राहण्यास सरकारने मज्जाव करावा, असे संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी सांगितले. जेणेकरून, काश्मिरी नागरिकांना शांततापूर्ण आणि समृद्ध जीवन जगता येईल. त्यासाठी सरकारने या सर्व फुटीरतावाद्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावे, असे त्यांनी म्हटले.
मुस्लिम राष्ट्रीय मंच या संघटनेचे हितचिंतक असणाऱ्या इंद्रेश कुमार संघटनेच्या जम्मू-काश्मीर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. ‘देशासमोरील आव्हाने आणि भारतीय मुस्लिमांची भूमिका’ या विषयावर बोलताना त्यांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर शरसंधान साधले.
पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या फुटीरवाद्यांना आत्तापर्यंत भारतीय भूमीवर राहू देणे, हा भारतीय सरकार आणि येथील जनतेचा चांगुलपणा आहे. मात्र, आता संयमाची सीमारेषा ओलांडली गेल्याची भावना यावेळी इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केली.
याशिवाय, काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी आगामी काळात संपूर्ण लक्ष विकासावर केंद्रित करून काश्मीरमधील जनमताचा आणि मदतीचा हात पुढे करणाऱ्या भाजपचा आदर करावा, असेही त्यांनी सांगितले. देश स्वतंत्र झाल्यापासून काश्मीरमध्ये सुरू असणाऱ्या जातीय दंगलीमुळे आजपर्यंत येथे अनेकजणांचे नाहक बळी गेले आहेत आणि येथील मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे येथील मुस्लीम जनतेने हुरियत कॉन्फरन्ससारख्या पक्ष आणि संधीसाधू राजकारण्यांकडून सुरू असलेले स्वत:चे शोषण थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले.