गेल्या वर्षांत आपण जे काही काम केले, त्याचा आढावा घेतानाच लोकांच्या अपेक्षा खूप असून अजून बरेच काही करता येऊ शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त केले. गरिबांचे जीवनमान सुधारावे म्हणून अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी पावले उचलण्याच्या मुद्दय़ाचा त्यांच्या भाषणात संदर्भ होता.

आपल्यासमोरील आव्हानांचा पद्धतशीर सामना करून लोकांचे जीवनमान सुधारणे, हे आपल्या सरकारसमोरील मुख्य काम होते. याखेरीज पायाभूत सुविधा आणि सेवांचा दर्जा सुधारण्याचेही आव्हान सरकारसमोर असल्याचे मोदी यांनी सांगितले. लोकांना लिहिलेल्या खुल्या दोन पानी पत्राद्वारे मोदी यांनी, आपल्या सरकारने उचललेल्या विविध पावलांचा उल्लेख केला.‘ही केवळ सुरुवात आहे आणि बरेच काही करण्याजोगेही आहे..तुमच्या आकांक्षा मोठय़ा आहेत, याची आपल्याला चांगली जाण आहे,’ असे मोदी यांनी नमूद केले. वर्षभरापूर्वी लोकांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी नीटपणे पार पडावी, यासाठी आपण अत्यंत प्रामाणिकपणे तसेच मनापासून काम करीत असून लोकांचा ‘प्रधान सेवक’ म्हणूनच कार्यरत असल्याचा दावा मोदी यांनी केला. आम्ही सत्तारूढ झालो, त्या वेळी प्रचंड भ्रष्टाचार आणि अनिर्णीतपणामुळे सरकारची अवस्था लकवा झाल्यासारखी होती.
आर्थिक असुरक्षा आणि चढय़ा चलन फुगवटय़ामुळे लोक अत्यंत हतबल झाले होते आणि त्यामुळे तातडीची व निर्णायक कृती करण्याची आवश्यकता होती व त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणाखाली आणण्यात आल्या, असा दावा मोदी यांनी केला. आर्थिक तूट कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आणि लोकांमध्ये आत्मविश्वास जागविण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. परदेशी गुंतवणुकीत वाढ झाल्याचेही ते म्हणाले. आपले सरकार अंत्योदयाच्या तत्त्वांनुसार चालत असून गरिबांसाठीच ते कार्यरत असल्याचे मोदी यांनी
नमूद केले.

किसान वाहिनीचे उद्घाटन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी डीडी किसान वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. कृषीक्षेत्राशी निगडित सदर वाहिनी असून तिचे प्रसारण सर्व दूरचित्रवाणी वाहिन्या आणि डीटीएचला बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीविना देशाची प्रगती होणार नाही, असे नमूद करून मोदी यांनी पीक उत्पादनक्षमता ५० टक्क्यांनी वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किसान वाहिनी सुरू करण्यात आली आहे.