मोबाइल फोन सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या मनोऱ्यातून बाहेर पडणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते, या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाबाबत आरोग्यमंत्रालयाला काहीही माहिती नसल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले असून या विद्युत चुंबकीय लहरींच्या घातक परिणामांपासून वाचवण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांबाबत सरकारने लोकांना माहिती द्यावी, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने दिला आहे.
  तंबाखूने कर्करोग होतो किंवा नाही याचे कुठलेही पुरावे भारतीय संशोधनात आढळलेले नाहीत, असा दावा तंबाखू नियंत्रण कायद्यावर नेमलेल्या समितीने केल्यानंतर आता विद्युत चुंबकीय लहरींमुळे कर्करोग होऊ शकतो याबाबतही सरकारला जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल माहीत नसल्याने सरकार अज्ञानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयोगाने आरोग्य, पर्यावरण व दूरसंचार व इतरांकडून शहरांमधील वाढते मोबाइल मनोरे व त्यांचे परिणाम याबाबत लोकांना माहिती देण्याच्या नियमांचे पालन करण्यात यावे, असा आदेश काढला आहे. मोबाइल प्रारणे ही हवा प्रदूषके म्हणून का जाहीर केली जात नाहीत, असा सवालही आयोगाने केला आहे. सुनावणीच्या वेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे, की रेडिओ फ्रिक्वेन्सी रॅडिएशनला हवा प्रदूषके घोषित करता येणार नाही पण मोबाइल फोनचे मनोरे रुग्णालये, शाळा, निवासी इमारती येथे उभारू नयेत एवढे करणे योग्य आहे कारण ते काही प्रमाणात मानवी व प्राण्यांच्या आरोग्यास घातक असतात
प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे, की आण्विक प्रारणे व क्ष किरणे ही डीएनएला भेदून जाऊ शकतात व त्यामुळे डीएनएमध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊन कर्करोग होऊ शकतो परंतु रेडिओ फ्रिक्वेन्सी रॅडिएशन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणे रासायनिक बंध तोडून आत जाण्याइतकी शक्तिशाली नसतात व त्यामुळे ती हानिकारक नसतात. या प्रकरणी अपील करणारे सुरेश चंद्र गुप्ता यांनी हा दावा खोडून काढताना सांगितले, की अनेक देशांत आरएफआर म्हणजे विद्युत चुंबकीय लहरींचा वाईट परिणाम झालेला आहे व जागतिक आरोग्य संघटनेने ही प्रारणे कर्करोगकारक असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचार्यलू यांच्यासमोर गुप्ता यांनी माहिती अधिकारात गोळा केलेली माहिती दाखवली, त्यानुसार विद्युतचुंबकीय प्रारणांमुळे कर्करोग होतो याबाबतचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल असल्याचे आरोग्य मंत्रालयाला माहिती नाही व त्याबाबत काही संशोधन करून घ्यावे असेही मंत्रालयाला वाटलेले नाही. १९८१ व १९८६ च्या प्रूदषण नियंत्रण कायद्यान्वये घन, द्रव व वायू स्वरूपातील सर्व घटक हे हवा प्रदूषकांमध्ये मोडतात व त्यांचे वाढते प्रमाण प्राणी व वनस्पती यांना धोकादायक असते. गुप्ता यांच्या मते विद्युत चुंबकीय प्रारणे ही गोंगाटासारखी असून त्यांना हवा प्रदूषके म्हटले जावे. २०१० मध्ये आंतरमंत्रालय समितीच्या अहवालात विद्युत चुंबकीय लहरी मधमाशा, पक्षी व प्राणी यांना घातक असल्याचे म्हटले होते, या प्रारणांचे प्रमाण किती आहे व किती काळ आपण त्यांना सामोरे जातो यावर वाईट परिणाम अवलंबून असतात असा दावा त्यांनी या अहवालाच्या आधारे केला. मानवी शरीर सूर्यप्रकाशासह अनेक प्रारणांना नैसर्गिकपणे सामोरे जाते पण त्यामुळे झालेली हानी भरून काढण्याची क्षमता शरीरात असते. जेव्हा पेशींची हानी प्रमाणाबाहेर होते, तेव्हा त्यात उत्परिवर्तन होते व विद्युत चुंबकीय लहरी या संथ गतीने काम करणाऱ्या विषासारख्या आहेत, असा दावा गुप्ता यांनी केला.