रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आल्यानंतर आता त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनादेखील सरकारकडून वाय दर्जाची व्हीव्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा पथकाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालात नीता अंबांनी यांना विशेष सुरक्षा देण्याची  शिफारस करण्यात आली होती. ही शिफारस मान्य करत केंद्रीय गृहमंत्रालयाने नीता अंबांनी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे (केंद्रीय राखीव पोलीस दल) १० सशस्त्र कमांडो तैनात करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. प्रवासादरम्यान नीता यांच्या सुरक्षा ताफ्यात पायलट आणि एस्कॉर्ट वाहन असणार असून त्यामुध्ये अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असे कमांडो तैनात असतील. वाय ही झेड दर्जाखालील सुरक्षा असली तरी या पथकांमधील कमांडो एकाचप्रकारची शस्त्रे वापरतात.
झेड दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत ४० सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येतात. सीआरपीएफकडून झेड आणि वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येते. झेड सुरक्षा ही झेड प्लसनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सुरक्षा आहे. सध्या भारतात ५८ व्हीव्हीआयपी व्यक्तींना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे.