वस्तू व सेवा करासह इतर महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे पावसाळी अधिवेशन पुन्हा बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. याची चर्चा करण्यासाठीच संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी सकाळी कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व विरोधकांना विधेयके मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचीही विनंती केली.
महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी गरज पडल्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, सर्वांशी चर्चा केल्यानंतर सरकार पावसाळी अधिवेशन पुन्हा बोलावण्याचा निर्णय घेईल. महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठीच हे अधिवेशन बोलावण्यात येईल. देशहिताचा विचार करून सर्व राजकीय पक्षांनी संसदेचे कामकाज चालू द्यावे. लोकशाहीमध्ये संसदेतील चर्चेला दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जीएसटी, भूसंपादन ही अत्यंत महत्त्वाची विधेयके आहेत. ती मंजूर झाली नाहीत, तर देशातील लोकांच्या अपेक्षांवर पाणी फिरेल. यामुळे देशातील तरूण रोजगारापासून वंचित राहील, असेही त्यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशन पुन्हा कधी बोलवायचे, याच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये हे अधिवेशन बोलावण्यात येऊ शकते.