सध्याचे सण आणि उत्सवाचे वातावरण पाहता देशातील अनेक विमान कंपन्यांनी त्यांच्या प्रवाशांना स्वस्तातला विमानप्रवास देणाऱ्या योजना राबविल्या आहेत. अशातच आता सरकारनेदेखील सामान्य नागरिकास परवडेल अशा दरातील विमानप्रवासाची योजना आखली आहे. आता समान्य नागरीकांना अडीच हजारांपर्यंतच्या दरात विमानप्रवास करणे शक्य होणार आहे. सरकार ‘उदय देश का आम आदमी’ या महत्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेला ‘पंख’ देणार आहे. जुलै महिन्यात या योजनेचा मसुदा तयार करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत एक तासाच्या विमानप्रवासासाठी २,५०० रुपये (सर्व करांसह) दर आकारण्यात येईल. सामान्य माणसाला विमानप्रवास शक्य व्हावा हे या योजनेमागील उद्दिष्ट आहे.

केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री गजपती गडपती राजू २१ ऑक्टोबरला याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. विमानप्रवासाच्या तिकिटाचे दर कमी करण्याबरोबरच विमानसेवेपासून वंचित असलेल्या कमी सुविधांच्या क्षेत्रांमध्ये विमान सेवा सुरू करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. देशातील अंतर्गत विमानसेवेला प्रोत्साहन देण्याबरोबरच वर्षभरातील प्रवाशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वृद्धी करण्याचा उद्देश देखील या योजनेत समाविष्ट आहे.

क्षेत्रीय संपर्क योजनेअंतर्गत (आरसीएस) पहिली उड्डाण सेवा यावर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षी जानेवारी मध्ये सुरू करण्याची सरकारला आशा आहे. या योजनेअंतर्गत एका तासाच्या विमान प्रवासासाठी अडीच हजार (सर्व करांसह) रुपये तिकीट दर, विमानसेवेपासून वंचित कमी सेवा उपलब्ध असलेल्या ५० विमानतळांचा विकास करण्यात येईल. ज्यायोगे देशातील हवाई संपर्काला अधिक चालना मिळेल. सध्याच्या परिस्थितीत देशातील ३९४ विमनतळं विमान सेवांपासून वंचित असून कमी प्रमाणात विमान सेवा पुरवीणारी १६ विमानतळं आहेत.