कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा माहिती नसल्याच्या गृह राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा बुधवारी काँग्रेसने समाचार घेतला. दाऊदच्या ठावठिकाणासंबंधीची अशी विधाने करून केंद्र सरकार देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असल्याचा घणाघात काँग्रेसने यावेळी केला. सत्तेत नसताना दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा करणारा भाजप आता सत्तेत आल्यानंतर मात्र आपल्या विधानावर घुमजाव करून देशातील नागरिकांमध्ये चुकीचा संदेश देत असल्याचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तासात गुलाब नबी आझाद यांनी दाऊदच्या ठावठिकाणा माहिती नसल्याच्या केंद्राच्या स्पष्टीकरणाचा मुद्दा उचलून धरला.
दाऊदचा ठावठिकाणा माहिती नाही, केंद्र सरकारचे घुमजाव
१९९३ बॉम्बस्फोटाची चौकशी सुरू करण्यात आली त्यावेळी यामागे दाऊदचा हात असल्याचे समोर आले. गेल्या २०-२२ वर्षांत दोन्ही सरकारांनी म्हणजेच अटलजी आणि काँग्रेस सरकारच्या काळात दाऊद पाकिस्तानातच असल्याची माहिती संसदेत वारंवार देण्यात आली आहे. गुप्तचर विभागालाही दाऊद पाकिस्तानात असल्याची माहिती आहे. तरीसुद्धा गृहराज्य मंत्र्यांनी दाऊदचा ठावठिकाणा माहित नसल्याचे विधान करणे म्हणजे देशाची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहे, असे गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले. दाऊदला पाकिस्तानातून पकडून आणण्यास यूपीए सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा भाजपने निवडणूक प्रचारावेळी वापरला होता आणि स्वत: मात्र सत्तेत आल्यानंतर ठावठिकाणा माहिती नसल्याचे सांगून नागरिकांना चूकीचा संदेश देत असल्याचेही ते पुढे म्हणाले.