देशातील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उभारणीसाठीचे ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी शनिवारी केली. १५व्या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील अमर जवान ज्योती स्मारकावर शहिदांना मानवंदना दिल्यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. स्मारकाच्या उभारणीसाठी सैन्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबर जेटली लवकरच दिल्लीतील इंडिया गेट संकुलाजवळील प्रिन्सेस पार्क येथील जागेची पाहणी करणार असल्याचे समजते. मात्र, यावेळी युद्ध स्मारक आणि संग्रहालयाचे भव्य स्वरूप पाहता, याच्या उभारणीसाठी आणखी काही काळ लागणार असल्याचेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले. या स्मारकासाठी केंद्र सरकारने १०० कोटींची तरतूद केली आहे.