खासगी एफएम वाहिन्यांना बातम्यांचे प्रसारण करण्यास परवानगी देण्याचा सरकार नक्कीच विचार करेल, असे आश्वासन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. एफएम वाहिन्यांवरील प्रसारणावर लक्ष ठेवू शकेल, अशी यंत्रणा देशपातळीवर निर्माण होत नाही, तोपर्यंत बातम्यांच्या प्रसारणाला परवानगी देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी खासगी एफएम वाहिन्यांना बातम्यांचे प्रसारण करण्याची परवानगी का दिली जात नाही, असा प्रश्न विचारला. परदेशांमध्ये एफएम वाहिन्यांवर बातम्यांच्या प्रसारणाला परवानगी आहे. आपल्याकडे मात्र या खासगी वाहिन्यांवर केवळ संगीतच बळजबरीने ऐकावे लागते, असे त्यांनी आपला प्रश्न विचारताना सांगितले. यावर राठोड म्हणाले, खासगी एफएम वाहिन्यांवर बातम्यांचे प्रसारण करण्यासंदर्भात सरकार नक्कीच विचार करेल. मात्र, एफएम वाहिन्या या केवळ ५० किलोमीटरच्या परिघात ऐकल्या जातात. त्यामुळे त्यांच्या प्रसारणावर देशपातळीवर लक्ष ठेवू शकेल, अशी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही. ती जोपर्यंत कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत अशा स्वरुपाची परवानगी देता येणार नाही. मात्र, सरकारने बातम्या या संकल्पनेतून अनेक गोष्टी वगळल्या आहेत. ज्यामध्ये खेळांचे समालोचन, सास्कृतिक कार्याक्रमांचे वार्तांकन अशा बाबी वगळण्यात आले असल्याचे राठोड यांनी सांगितले.