आयुकासह भारतातील इतर संस्थांमधील ३८ संशोधकांचाही गौरव

लायगो या गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्याच्या प्रयोगातील यशामुळे त्यात सहभागी झालेल्या वैज्ञानिकांना मूलभूत भौतिकशास्त्रातील विशेष पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार २० कोटी रुपयांचा असून, युरी मिलनर यांनी ठेवलेला हा पुरस्कार दोन संशोधन गटांना दिला जाईल. त्यात  लायगो इंडियातील आयुकासह इतर संस्थांच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. लायगो वेधशाळेच्या तीन संस्थापकांना ६.६५ कोटी रुपये विभागून दिले जाणार असून, या प्रयोगातील १०१२ सहभागी संशोधक व इतर व्यक्तींना १३.३१ कोटी रुपये समान वाटून दिले जातील. लायगोच्या संस्थापकांमध्ये रोनाल्ड डब्ल्यू पी ड्रेव्हर, कीप थोर्न व रेनर वेस यांचा समावेश आहे. इतर १०१२ सहभागी व्यक्तींमध्ये १००५ जणांनी संशोधन निबंध लिहिले आहेत, तर इतर सात जणांनी संशोधनात मोठे काम केले आहे. चेन्नई मॅथेमेटिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेचे के. जी. अरुण यांनी सांगितले, की हे महत्त्वाचे पारितोषिक आहे व त्याचे श्रेय सहकार्य भावनेला आहे. जगातील अनेक संशोधक एकत्र आले व त्यांनी माहितीचे विश्लेषण केले. या प्रयोगात एकूण ३८ भारतीय सहभागी होते. लायगो इंडिया प्रकल्पात २०१२ पासून अनेक भारतीय संस्था एकत्र काम करू लागल्या.

आयुकाच्या अठरा वैज्ञानिकांचा सन्मान

ज्या १०१२ जणांनी संशोधनात भाग घेतला त्यात पुण्याच्या आयुकाचे ८ विद्यमान, ६ माजी, दोन अभ्यागत संशोधक आहेत, त्याशिवाय दोन संशोधक विद्यार्थ्यांनीही यात काम केले होते. आयुकाचे अनीरबन एन, सुकांत बोस, संजीव धुरंधर, शरद गावकर, अनुराधा गुप्ता, संजीत मित्रा, निखिल मुकुंद, तरुण सौरदीप, अर्णव मुखर्जी, अर्चना प, जयंती प्रसाद, बी. एस. सत्यप्रकाश, राजेश के. नायक, आनंद सेनगुप्ता, सोमा मुखर्जी, श्व्ोता भागवत यांचा समावेश आहे. या सर्व संशोधकांचा गौरव २०१६च्या उन्हाळय़ात केला जाणार आहे व त्यांना विशेष पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. लायगोच्या तीन संस्थापकांना ५० लाख डॉलर्सचा ग्रबर कॉस्मॉलॉजी पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील सर्व रक्कम त्या तीन संस्थापकांना मिळणार असली तरी पुरस्कारात सर्व संशोधकांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.