ग्रीसचे माजी पंतप्रधान ल्यूकस पॅपेडमोस हे स्फोटात जखमी झाले आहेत. पॅपेडमोस यांच्या कारमध्ये स्फोट झाला असून लेटर बॉम्बद्वारे हा स्फोट घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

गुरुवारी ल्यूकस पॅपेडमोस हे अथेन्समध्ये त्यांच्या कारमधून जात असताना कारमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटात पॅपेडमोस आणि त्यांचा चालक जखमी झाला. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पॅपेडमोस हे नोव्हेंबरमध्ये २०११ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राजकीय आणि आर्थिक उलथापालथ सुरु असताना त्यांची या पदावर निवड करण्याल आली होती. मे २०१२ पर्यंत ते पंतप्रधानपदावर होते. युरोपियन सेंट्रल बँकेच्या उपाध्यक्षपदीही त्यांनी काम केले होते. सध्या नाटो देशांच्या अधिवेशनात असलेल्या ग्रीसच्या पंतप्रधानांना या घटनेची माहिती देण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पॅपेडमोस यांच्या कारमध्ये आणखी दोन जण असल्याचे समजते. पण त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. स्फोटात लेटर बॉम्बचा वापर झाल्याचे सूत्रांकडून समजते. या घटनेचा तपास सुरु असल्याचे स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी सांगितले.