कोळशावर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांवर भारत अवलंबून असल्याने त्यातूनच वीज निर्मिती होते पण या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात कार्बन डायॉक्साईडची निर्मिती होते. अमेरिका आता हा कार्बन डायॉक्साईड पकडण्याचे तंत्र विकसित करण्यास भारतीय तंत्रज्ञ, वैज्ञानिक, कंपन्या यांच्याशी सहकार्य करण्यास तयार आहे.
कार्बन पकडण्याचे तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर केल्यास ते किफायतशीर ठरते व जगातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाणही कमी होते असे सांगण्यात आले. स्वच्छ ऊर्जा पर्यायाच्या अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या योजनेनुसार अमेरिकेने सहकार्याचा हात पुढे केला आहे.  
व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही भारतासमवेत काम करण्यास तयार आहोत त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडून येईल. हवामान बदलांचे विपरीत परिणाम जनसमुदायांवर होत आहेत. कार्बन क्लीन सोल्युशन्स या भारतीय कंपनीने रासायनिक व ऊर्जा प्रकल्पांमधील कार्बन डायॉक्साईड पकडण्याचे तंत्रज्ञान पथदर्शक पातळीवर राबवण्याची तयारी दर्शवली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्बन डायॉक्साईड शोषून घेतला जातो.
अनिरुद्ध शर्मा व प्रतीक बंब या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी कार्बन क्लीन सोल्युशन्स ही कंपनी स्थापन केली असून ते अमेरिकेच्या मदतीने कार्बन शोषून घेणाऱ्या सॉल्व्हंटची चाचणी घेणार आहेत. अमेरिकेच्या ऊर्जा विभागात नॅशनल कार्बन कॅप्चर सेंटर येथे या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे.
 भारताने कार्बन पकडण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेकडून घेण्यात स्वारस्य दाखवले असून भारतही या क्षेत्रात संशोधन करीत आहे पण ते अजून फार प्रगत नाही. अमेरिकेच्या कार्बन पकडण्याच्या केंद्रात ५०० संकल्पना विकसित करण्यात आल्या असून वैज्ञानिक त्यावर काम करीत आहेत.