राष्ट्रपतींनी मोहोर उमटविल्यानंतर विधेयक राज्यांच्या विधिमंडळांत

राज्यसभेचा मुख्य अडथळा पार केल्यानंतर बहुचर्चित वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) सुधारित राज्यघटना दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये ४४३ विरुद्ध शून्य मतांनी संमत झाले. राष्ट्रपतींची औपचारिक मोहोर उमटल्यानंतर जीएसटीचा मुख्य वैधानिक टप्पा पूर्ण होऊन चेंडू राज्यांच्या कोर्टामध्ये जाईल. किमान १६ राज्यांच्या विधिमंडळांची संमती मिळवावी लागणार आहे.

राज्यसभेमध्ये जीएसटी विधेयक बुधवारी संमत झाले. मूळ विधेयक लोकसभेने मागील वर्षीच मंजूर केले होते; पण राज्यसभेने त्यात नऊ  दुरुस्त्या सुचविल्याने लोकसभेची पुन्हा संमती घेणे आवश्यक होते. सोमवारी दुपारी दोन वाजता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विधेयक सादर केले आणि सुमारे साडेपाच तासांच्या चर्चेनंतर ते संमत झाले. अण्णाद्रमुकने राज्यसभेप्रमाणेच लोकसभेतही मतदानावर बहिष्कार घातला.

सोमवारच्या चर्चेचे वैशिष्टय़ होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण. राज्यसभेमध्ये अनुपस्थित राहिलेल्या पंतप्रधान मोदींची जीएसटीवरील भूमिका तशी पहिल्यांदाच स्पष्ट झाली. कारण यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी जीएसटीला विरोध केला होता. श्रेयावरून काँग्रेसची चलबिचल ओळखून मोदी सुरुवातीलाच म्हणाले, ‘हा काही कोणाचा विजय अथवा पराजय नाही. देशाच्या सर्वोच्च राजकीय प्रथापरंपरेचा विजय आहे. यातून सर्व राजकीय पक्षांची परिपक्वता दिसली आहे. खरे तर, यास एकाने ‘जन्म’ दिला, तर दुसऱ्याने त्याचे मायेने ‘संगोपन’ केले आहे. म्हणूनच श्रेय सर्वाचे आहे. कारण लोकशाही म्हणजे फक्त आकडय़ांचा खेळ नाही. सर्वसहमती बनविण्याची ती एक कला आहे. देशाच्या साठ वर्षांच्या इतिहासातील जीएसटी एक मोठे पाऊल आहे. जीएसटी म्हणजे नुसता कर नाही. ‘टीम इंडिया’ने उचललेले ते एक महान पाऊल आहे, व्यापक फेरबदलांच्या दिशेने जाणारी एक महान पायरी आहे आणि पारदर्शकतेकडे घेऊन जाणारा सर्वोत्तम टप्पा आहे,’ अशा शब्दांत मोदींनी जीएसटीचे अनेक फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

  • गरजेच्या सुमारे ५५ टक्के वस्तूंवर कर नसेल.
  • कर सुलभ होतील, कर दहशतवाद संपेल.
  • करवसुलीचा खर्च घटे, काळा पैशांच्या निर्मितीला चाप बसेल.
  • ग्राहक खऱ्या अर्थाने राजा होईल, मागास राज्यांच्या हातांमध्ये गरिबी निर्मूलनासाठी पैसा खेळेल आदी मुद्दय़ांवर मोदी यांनी या वेळी भर दिला.

जीएसटीला एकाने ‘जन्म’ दिला, तर दुसऱ्याने त्याचे मायेने ‘संगोपन’ केले आहे. म्हणूनच श्रेय एकटय़ा भाजपचे नाही. तर ते सर्वाचे आहे.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान