वस्तू आणि सेवाकर (GST) परिषदेने आज झालेल्या बैठकीत ६६ वस्तूंवरच्या वस्तू आणि सेवा करात बदल करून ते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ही माहिती आज झालेल्या बैठकीनंतर दिली आहे. आमच्याकडे एकूण १३३ वस्तूंवरच्या जीएसटी मध्ये बदल करावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ६६ सामानांवरच्या जीएसटीमध्ये आम्ही बदल करून ते कमी केले आहेत असेही जेटली यांनी म्हटले आहे. ट्रॅक्टर आणि त्यासंदर्भातली यंत्रसामुग्री यावर आधी २८ टक्के जीएसटी होता, तो आता १८ टक्के असणार आहे. हा निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

कॉम्प्युटर प्रिंटरवरही २८ ऐवजी १८ टक्के कर लागणार आहे. काजूवर १८ ऐवजी १२ टक्के कर लागेल. अशी माहिती अरूण जेटली यांनी दिली आहे. तसेच जीएसटी परिषदेची पुढची बैठक पुढच्या रविवारी अर्थात १८ जूनला होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या सिनेमागृहांमध्ये सिनेमाचे तिकीट १०० रूपयांपेक्षा कमी आहे त्या तिकीटांवर २८ ऐवजी १८ टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र १०० रूपयांपेक्षा जास्त तिकीटदर असलेल्या तिकीटांवर २८ टक्के जीएसटी कायम राहणार आहे.

टेलिकॉम सेक्टरवर असलेला १८ टक्के जीएसटी तसाच ठेवला जाणार आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीने हा कर कमी करण्याची मागणी केली होती मात्र ती पूर्ण झालेली नाही. इन्शुलिनवर १२ ऐवजी ५ टक्के कर लागणार आहे. उदबत्तीवरचा करही १२ वरून ५ टक्के करण्यात आला आहे. तर सॅनिटरी नॅपकीनवर लागणाऱ्या करांमध्येही काहीही बदल करण्यात आलेला नाही असेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे. सॅनिटरी नॅपकीनवर कर लावूच नये अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती. मात्र या करासंदर्भात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.