जीएसटी परिषदेची बैठक ऑगस्ट महिन्यात होणार आहे. १ जुलै २०१७ पासून देशात जीएसटी लागू करण्यात आला. ही करप्रणाली नेमकी कशी आहे हे समजण्याचा प्रयत्न होतो आहे अशातच अनेक सामाजिक घटकांच्या मागणीनुसार विविध वस्तूंवरच्या करांवर फेरविचार करण्याची मागणी केली जाते आहे. या मागण्यांचा विचार करता जीएसटी परिषद यावर ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या बैठकीत चर्चा करू शकते आणि काही वस्तूंवरचा जीएसटी कमी करू शकते अशी शक्यता आहे.

एवढंच नाही तर १ जुलैपासून म्हणजेच जीएसटी लागू झाल्यापासून देशात किती महसूल जमा होतो आहे याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे असं केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सप्टेंबरच्या शेवटी जेव्हा लोक आयटी रिटर्न्स भरतील तेव्हा नेमक्या महसुलाबाबत माहिती मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जीएसटी परिषदेची बैठक ५ ऑगस्टला होणार आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केलं आहे.

या बैठकीत नव्या करप्रणालीसंदर्भातला आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत राज्यांचे अर्थमंत्री सहभागी होणार आहेत. जीएसटी लागू केल्यानंतर अर्थव्यवस्थेत काय बदल झाले आहेत? तसंच हा कराची राज्यांमध्ये योग्य रितीनं अंमलबाजवणी झाली आहे की नाही? याबाबत चर्चा होऊ शकते असेही संकेत जेटली यांनी दिले आहेत.

काही कापड व्यापाऱ्यांनी कापडावरचा जीएसटी ५ वरून ० टक्के करावा अशी मागणी कापड व्यापाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे यावर आम्ही विचार करू शकतो असंही जेटली यांनी म्हटलं आहे. राज्यांच्या महसुलामध्ये काही फरक पडला आहे याबाबतचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. १ जुलैनंतर देशाच्या महसुलात भर पडली आहे असंही जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या बैठकीत नेमक्या कोणत्या वस्तूंवरचा जीएसटी कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.