गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांकडून प्रचाराला प्रारंभ झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नवसर्जन जनादेश महासंमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर निशाणा साधला. जीएसटी लागू केल्यामुळे देशाचे मोठे नुकसान होणार असून यामुळे छोटे व्यापारी संपल्याचा आरोप त्यांनी केला. यांचं जीएसटी हे जीएसटी नसून ते गब्बर सिंग टॅक्स आहे. या टॅक्समुळे देशातील लाखो युवक बेरोजगार झाले आहेत. हा टॅक्स सुलभ केलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच येणारे २०१७ हे वर्ष भाजपसाठी ‘खतरा’ ठरणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या प्रसंगी अल्पसंख्याक नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गेल्या २२ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजप सरकार हे लोकांसाठी नव्हे तर फक्त ५ ते १० उद्योगपतींसाठी काम करत आहे. मोदी बड्या उद्योजकांचे खिसे भरण्याचे काम करत असल्याचा आरोप करत मोदींनी नॅनो प्रकल्पासाठी ३५ हजार कोटी रूपये दिलेत. एवढ्या पैशांत गुजरातच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती. पण तुम्ही कधी शेतकऱ्यांचा आवाज ऐकलाच नाही. मोदीजी तुम्ही ‘मन की बात’ करता परंतु, आज मी तुम्हाला गुजरातच्या जनतेची ‘मन की बात’ ऐकवतो, असे म्हटले.

ना खाऊंगा, ना खाने दुंगा, असे मोदी म्हणतात. आता अमित शहा, जय शहा यांच्या कंपनीवर होत असलेल्या आरोपांवर एक वाक्य तरी बोला. आता तुम्ही गप्प का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदींचा ‘मेक इन इंडिया’ सपशेल फसला असून यामुळे देशाला काहीच फायदा होणार नसल्याचे ते म्हणाले.

पाटीदार नेत्यांना लाच देऊन पक्षात घेण्याच्या प्रकारावरही टीका केली. संपूर्ण देशाचे बजेट यासाठी खर्च करा. सगळ्या जगातील पैशानेही गुजरातचा आवाज दाबला जाऊ शकणार नाही. इंग्रजांनी गांधीजींना दाबण्याचा प्रयत्न केला. आता भाजप गुजराती लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.