वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठी मोदी सरकारने शाही सोहळ्याचे आयोजन केले असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचाने जीएसटीला विरोध दर्शवला आहे. जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असून यामुळे चीनमधून आयातीचे प्रमाण वाढेल अशी भीती स्वदेशी जागरण मंचाने व्यक्त केली आहे.

स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक अश्विनी महाजन यांनी जीएसटीसंदर्भात भूमिका मांडली. १.५ कोटी रुपयांपर्यंत उत्पादन असलेल्या लघु उद्योजकांना अबकारी करातून सूट देण्यात आली आहे. महाजन यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधत जीएसटीतील नियमावलींवर बोट ठेवले. जीएसटीमध्ये २० लाखांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्यांना जीएसटीसाठी नोंदणी करावीच लागेल असे म्हटल्याचे महाजन यांनी सांगितले. या नियमामुळे लघूउद्योगांवर कराचा बोजा वाढणार असून लघूउद्योगांवर याचा परिणाम होईल असा दावा त्यांनी केला.

लघूउद्योगांवर नकारात्मक परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील जनतेचा रोजगार हिरावला जाऊ शकतो. देशांअंतर्गत उत्पादन कमी झाल्याने याचा चीनला फायदा होईल आणि चीनमधून आयातीचे प्रमाण वाढेल असे महाजन यांचे म्हणणे आहे.  स्वदेशी जागरण मंचाने जीएसटीला विरोध दर्शवला असला तरी केंद्र सरकारने जीएसटीमुळे आर्थिक विकास दरात २ टक्क्यांनी वाढ होईल असा दावा केला आहे. मोदी सरकारसाठी जीएसटी हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो.

स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकार उत्साही आहे. १ जुलैपासून देशभरात एक कर रचना अस्तित्वात येणार असून पूर्वसंध्येला तिच्या मुहूर्तासाठीची तयारीही झाली आहे. संसदेच्या वर्तुळाकार मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान, काही माजी पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभेचे अध्यक्ष तसेच अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित असतील.