पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द झाल्यापासून देशभरातील बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करुन आता जवळपास महिना पूर्ण झाला आहे. मात्र तरीही बँकांमधील रांगा काही कमी झालेल्या दिसत नाहीत. बँकेमधील आणि बँकेबाहेरील गर्दीचे नियंत्रण करताना बँक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. पंजाबमधील एका बँक रखवालदाराला गर्दीला आवर घालण्यासाठी हवेत गोळी झाडावी लागली आहे. बँकेबाहेरील गर्दी पांगवण्यासाठी रखवालदाराने हवेत गोळीबार केला.

मंगळवारी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील बुधलादातील एचडीएफसी बँकेबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली होती. पैसे काढण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बँकेबाहेर उभे होते. बँकेत शिरण्यासाठी लोकांनी जोरदार धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. अनेकदा शांत राहण्याचे आवाहन करुनही लोक ऐकत नसल्याने अखेर बँकेच्या रखवालदाराने हवेत गोळीबार केला. त्यामुळे लोक बँकेच्या दरवाज्यापासून दूर पळाले. हा सारा प्रकार एका व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. एका व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेयर केला आहे. ‘या गोळीबारात कोणीही जखमी न झाल्याने या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.

८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलीकरणाचा निर्णय जाहीर केला. यामुळे पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवादाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामुळे सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावे लागल्याची टीका विरोधकांकडून केली जाते आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरुन विरोधकांनी संसद दणाणून सोडली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीचा निर्णय हा गैरव्यवस्थापनाचा उत्तम नमुना असल्याची टीका केली होती. नोटाबंदी ही संघटित लूट असून त्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार आहे, असे मनमोहन सिंग यांनी संसदेत बोलताना म्हटले होते.

पाचशे आणि हजाराच्या नोटांचे चलनातील प्रमाण ८६% इतके होते. मात्र एका क्षणात नोटा रद्द झाल्याने देशभरात चलन तुटवडा निर्माण झाला. सरकारने दोन हजार आणि पाचशेच्या नोटा आणल्या. मात्र या नोटांसाठी एटीएम मशीनचे रिकॅलिब्रेशन आवश्यक असल्याने या नोटा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बराच कालावधी गेला. त्यामुळे देशभरात चलन कल्लोळ पाहायला मिळाला.