अमेरिकेने भारताशी संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे ठरवले असून, टेहळणीसाठी गार्डियन ड्रोन देण्यास मंजुरी दिली आहे. संरक्षण सामग्री व तंत्रज्ञानात अमेरिका भारताला मदत करणार असल्याचे अध्यक्ष ट्रम्प व पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेनंतर प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारताच्या सागरी सुरक्षेला मजबुती देण्यासाठी गार्डियन ड्रोन उपयोगी पडणार आहेत. भारतीय नौदलाची गुप्तचर, टेहळणी क्षमता यामुळे वाढणार आहे. हा करार दोन ते तीन अब्ज डॉलर्सचा असून, २२ गार्डियन ड्रोन अमेरिका भारताला देणार आहे. संयुक्त निवेदनात म्हटल्यानुसार अमेरिकेचा भारताबरोबरचा संरक्षण व्यापार १९ अब्ज डॉलर्सचा असून, त्यामुळे अमेरिकी लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

एफ १६ व एफए १८ विमाने भारताला विकण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. अमेरिका व भारत वज्र प्रहार, रेड फ्लॅग (भारतीय हवाई दल) युद्ध अभ्यास या कवायतीत एकत्र सहभागी होणार आहेत.

गार्डियन ड्रोन

गार्डियन ड्रोन विमाने मानवरहित असतात ती २७ तास आकाशात राहू शकतात व ५०००० फूट उंचीवरून उडू शकतात. भारतीय नौदलाने गार्डियन ड्रोनची मागणी गुप्तचर माहिती मिळणे सोपे व्हावे यासाठी केली होती.