उद्योजक बनण्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी गुजरात सरकार शालेय पाठ्यपुस्तकात रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्यावर एक धडा समाविष्ट करण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील शालेय अभ्यासक्रम मंडळाच्या पदाधिकाऱयांची एक बैठक शालेय शिक्षण मंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी नुकतीच बोलावली होती. या बैठकीतच त्यांनी अंबानी यांच्यावरही एक धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची कल्पना मांडली. देशातील प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील संघर्ष आणि जीवन याबद्दल शालेय मुलांना माहिती मिळावी, असे त्यांनी या बैठकीत सांगितले. त्यावेळी त्यांनी धीरूभाई अंबानी यांचे नाव घेतले. गुजरात राज्य शालेय पाठ्यपुस्तक मंडळाचे प्रमुख नितीन पेठानी यांनी याबद्दल माहिती दिली. अंबानी यांच्यासोबतच आपल्या कार्याने समाजासाठी योगदान देणाऱया इतर महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती देणारा धडाही पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.