गुजरातमध्ये २००२ला घडलेल्या दंगली दुर्दैवी होत्या, अशी भावना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपियन युनियनमधील प्रतिनिधीसमोर व्यक्त केली. गोध्राकांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींमुळे मोदी यांच्यावर युरोपियन युनियनमधील देशांकडून घालण्यात आलेली बंदी काही दिवसांपूर्वी उठविण्यात आली. त्यानंतर गेल्या महिन्यात मोदी यांनी युरोपियन युनियनमधील देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. जर्मनीचे राजदूत मायकल स्टेनर यांनी ही बैठक आयोजित केली होती. 
मूळात या बैठकीत काय घडले याची माहिती अतिशय़ गोपनीय ठेवण्यात आली होती. युरोपियन युनियनचे राजदूत जोओ क्राव्हिनो यांनी त्याबद्दल नुकतीच माहिती दिली. यापार्श्वभूमीवर स्टेनर यांनी शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याची आमची अजिबात इच्छा नव्हती. निवडणूक निकालानंतर आम्ही गुजरातमधील परिस्थितीचा नव्याने आढावा घेण्याचे ठरविले होते. त्यामुळेच आम्ही मोदी यांच्याशी थेटपणे संवाद साधला. भारतात लोकशाही व्यवस्था असून, त्यावर आमचा विश्वास आहे. भारतातील निवडणूक निकालांवर आणि येथील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. या दोन्हींवर विश्वास असल्यामुळेच आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत.
मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत जास्त काही सांगण्यास स्टेनर यांनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने दिलेल्या निर्णयांना आपण बांधील आहोत आणि त्यावेळी घडलेल्या घटना खरंच दुर्दैवी होत्या, असे मोदी यांनी या प्रतिनिधींना सांगितले.