गावातील गरबा बघण्यासाठी गेलेल्या २१ वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना गुजरातमध्ये घडली. याप्रकरणी पटेल समाजातील ८ जणांना पोलिसांनी अटक केली.

आणंद जिल्ह्यातील भद्रानिया गावात राहणारा जयेश सोलंकी, त्याचा चुलत भाऊ प्रकाश सोलंकी आणि त्यांचे दोन मित्र शनिवारी रात्री गावातील गरबा बघण्यासाठी गेले होते. यावेळी संजय पटेल या तरुणाने जयेशला हटकले आणि त्याला जातिवाचक शिवीगाळ केली. दोघांमधील वादाने हिंसक वळण घेताच संजयचे मित्र चिंतन पटेल, जिग्नेश पटेल, ऋत्विक पटेल, धवल पटेल, विकी पटेल, रिपेन पटेल आणि दिपेश पटेल हे देखील घटनास्थळी आले. या सर्वांनी मिळून जयेश सोलंकीला बेदम मारहाण केली. ‘तुम्ही दलित असून तुम्हाला गावातील गरबा पाहण्याचा अधिकार नाही’, असे या पटेल समाजातील तरुणांचे म्हणणे होते.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आठही आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जे एन देसाई यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिली. हत्या, अॅट्रोसिटी अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे चारच्या सुमारास जयेशला मारहाण करण्यात आली. जयेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्धावस्थेत होता. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. हा पूर्वनियोजित हल्ला नव्हता, दोन्ही गटांमध्ये पूर्ववैमनस्यही नव्हते. आम्ही या घटनेचा सखोल तपास करत आहोत, असे पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले.