अन् घोषणांचा पाऊस

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी राजकीय पक्षांनी प्रचारात रंग भरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आठवडय़ांत तीन वेळा आणि सप्टेंबरपासून पाच वेळा गुजरातचा दौरा  केला. त्यात त्यांनी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याबरोबरच अनेक योजनांची घोषणा केली.

७ आणि ८ ऑक्टोबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ आणि ८ ऑक्टोबरला गुजरातचा दौरा केला. त्यांनी ओखा आणि द्वारका यांना जोडणाऱ्या पुलाबरोबरच रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन केले. अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाची आणि राजकोट-मोर्बी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणाही मोदी यांनी केली. मोदी यांनी या दौऱ्यात ‘पंतप्रधान ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियानाचीही सुरूवात केली. तसेच आयआयटी गांधीनगरमधील नव्या इमारतीचे उद्घाटनही त्यांनी केले. नर्मदावरील एका बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्याबरोबरच सुरत ते बिहारमधील जयनगर या अंत्योदय एक्स्प्रेसलाही पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवला.

१६ ऑक्टोबर

पंतप्रधानांनी १६ ऑक्टोबरच्या गुजरात दौऱ्यात कोणतीही नवी योजना जाहीर केली नाही. मात्र, गांधीनगर येथील सभेत भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांना मोदींनी मार्गदर्शन केले. त्यातून भाजपने शक्तिप्रदर्शन केले.

२२ ऑक्टोबर

पंतप्रधानांनी घोघा ते दाहेज यादरम्यान नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी सागरी विद्यापीठ आणि सागरी संग्रहालय स्थापण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी १,१४४ कोटींच्या विविध प्रकल्पांची घोषणा केली. त्यात उड्डाणपुलांसह इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.