गुजरातमध्ये घोडेबाजार सुरू असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. आमच्या पक्षातील आमदार पुनाभाई गमित यांना भाजपने १० कोटी रुपयांची ऑफर दिली होती असा गंभीर आरोप काँग्रेसने केला.

गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसात काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले. देशात पक्षांतरबंदी कायदा असून सुप्रीम कोर्टाने या कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले होते असे सिंघवी यांनी सांगितले. गुजरातमध्ये भाजपकडून आमदारांच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आमदार पुनाभाई गमित यांना भाजपत येण्यासाठी १० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या या आरोपांवर अद्याप भाजपने प्रतिक्रिया दिलेला नाही.

गुजरात काँग्रेसमध्ये गळती सुरु असून पाच आमदार आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. १८२ जागा असलेल्या विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ आता ५२ वर आले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपच्या रामनाथ कोविंद यांच्याबाजूने मतदान केले होते. मीराकुमार यांना ५७ मते अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यांना ४९ मतेच मिळाली. काँग्रेसचे आमदार मानसिंह चौहान, छनाभाई चौधरी, बलवंतसिह राजपूत, तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी भाजपत प्रवेश केला आहे. यातील बलवंतसिंह राजपूत यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारीदेखील दिली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसमधील आमदारांना फोडून गांधी घराण्याचे निकटवर्तीय अहमद पटेल यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.