गुजरातमधील पाटण जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरुन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाने दंगलीचे रुप धारण केले. वडवली गावात १२ हून अधिक घरं जाळण्यात आली असून भीती पोटी ग्रामस्थांनी गावाबाहेर स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून जिल्ह्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये सध्या दहावीच्या परिक्षा सुरु आहेत. परीक्षेचा पेपर सुटल्यावर सर्व विद्यार्थी जिन्यावरुन उतरत होते. यातील एका विद्यार्थी जिन्यावरुन पडला. यावरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. विद्यार्थ्यांनी या प्रकाराची माहिती ग्रामस्थांना देताच सुमारे पाच हजार लोकांच्या जमावाने वडवली गावात धडक देत अक्षरशः धुडगूस घातला. जमावाने १२ हून अधिक घरांमध्ये तोडफोड केली तर २० हून अधिक घरांना पेटवून दिले. याशिवाय असंख्य वाहनेही जाळण्यात आली. या दंगलीत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबारही करण्यात आला.

वडवली गावात सध्या भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांनी भीतीपोटी गाव सोडून जाण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी धारपूरमधील वैद्यकीय महाविद्यालयाचा आधार घेतला आहे. गुजरातच्या पोलीस महासंचालकांनी सध्या परिस्थितीत नियंत्रणात असल्याचे सांगितले. आम्ही राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या गावात तैनात केल्या आहेत असे पोलीस महासंचालक पी पी पांडे यांनी सांगितले.वडवली गावातील जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर पाटण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  आम्ही वडवली गावात मोहीम राबवत असून संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.