गुजरातमध्ये काँग्रेसला गळती सुरुच असून आणखी दोन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार बलवंतसिंह राजपूत आणि आमदार तेजश्री पटेल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनीदेखील काँग्रेसला अलविदा केला होता.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. गुरुवारी काँग्रेसचे दोन आमदार बलवंतसिंह राजपूत आणि तेजश्री या दोघांनी काँग्रेसला रामराम ठोकला. या दोघांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमधील कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

गुजरातमधील काँग्रेसच्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची ही दुसरी घटना आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून चेहरा जाहीर करण्यास नकार दिल्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी गेल्या आठवड्यात पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. बोफोर्स या गांधी घराण्याशी संबंधीत प्रकरणात माजी परराष्ट्रमंत्री माधवसिंह सोळंकी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच काँग्रेस नेतृत्वाने सोळंकी यांचे पुत्र आणि प्रदेशाध्यक्ष भरतसिंह यांना झुकते माप दिल्याची चर्चा होती. मात्र यामुळे वाघेलांची कोंडी झाली आणि त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. नाराज दलित वर्ग आणि पाटीदार समाज, भाजपविरोधी वातावरण अशा स्थितीत काँग्रेसला गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. पण अशा पद्धतीने गळती सुरुच राहिली तर काँग्रेसची वाट बिकट असल्याचे दिसते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गुजरातमध्ये काँग्रेसमधील मते फुटल्याचा संशय होता. गुजरातमध्ये भाजपकडे ११६ आमदार असून निवडणुकीत कोविंद यांना १३२ मते पडली. काँग्रेसची ११ आमदारांची मते फोडण्यात भाजपला यश आल्याची चर्चा आहे.