मी संसदेत बोललो तर भूकंप होईल असे सांगणा-या राहुल गांधी यांनी अखेर नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना नरेंद्र मोदी यांना सहारा समुहाकडून सहा महिन्यात तब्बल ४० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप गांधींनी केला आहे. सहारा समुहावर आयकर विभागाने २०१४ मध्ये धाड टाकली असताना तिथे काही कागदपत्र आढळले होते. यावरुन हा खुलासा झाला होता. या सगळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातमध्ये मेहसाणामध्ये जाहीर सभा घेतली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदींविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा केला होता. मी पुरावे समोर आणले तर भूकंप होईल असे गांधी यांनी म्हटले होते. अखेर मेहसाणामधील सभेत राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत राजकीय भूकंप घडवण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहारा समुहाकडून त्यांना सहा महिन्यात ९ वेळा पैसे मिळाले. मोदींना कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला पैसे मिळाले याची आकडेवारीच त्यांनी सादर केली आहे. इतकेच नव्हे तर बिर्ला समुहावरील छाप्यात आयकर विभागाला एक डायरी आढळली होती. यात गुजरात सीएम २५ कोटी असा उल्लेख आढळला होता. आयकर विभागाकडे गेल्या अडीच वर्षांपासून ही सर्व माहिती आहे. पण अद्याप त्यावर कारवाई झाली नाही. आता या सर्व आरोपांची चौकशी करणे गरजेचे आहे असे गांधी यांनी सांगितले.

नोटाबंदीवरुनही राहुल गांधी यांनी  मोदींवर निशाणा साधला. एक टक्का काळा पैसाधारकांऐवजी मोदींनी ९९ टक्के सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले. पुढील ६ ते ७ महिने गरीबांचा बँकेत अडवून धनाढ्य कर्जदारांचे कर्ज माफ करण्याचा त्यांचा कट आहे. नोटाबंदीचा  निर्णय हा काळा पैसाविरोधात नव्हे तर सर्वसामान्य जनतेविरोधात सर्जिकल स्ट्राईक होता असे गांधींनी सांगितले. सगळा पैसा हा काळा धन नसतो आणि सर्व काळा पैसा हा रोख स्वरुपात नसतो असेही त्यांनी स्पष्ट केले. एखादा गरीब किंवा शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर त्यांना तुरुंगात पाठवले जाते. पण एखाद्या धनाढ्याने कर्ज बुडवल्यास तो ‘चोर’ नसतो तर कर्ज बुडवणारा असतो याकडेही गांधी यांनी लक्ष वेधले. गरीबांकडून पैसे आणा आणि श्रीमंताना पैसे पुरवा हेच नोटाबंदीचे लक्ष्य असल्याची टीका त्यांनी केली.

मोदींनी भ्रष्टाचार संपवण्यासाठी कोणताही निर्णय घेतला तर काँग्रेसचा त्याला पाठिंबाच असेल असे त्यांनी आवर्जून सांगितले. मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमधील भाजपने आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावल्या. एखादा व्यक्ती आपल्या हक्कासाठी त्यांच्याविरोधात उभा राहिला तर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात असा आरोप त्यांनी केला. देशातील कामगारवर्ग देश घडवतो, पण मोदींनी त्यांच्यापासून मनरेगा ही योजना हिरावून घेतली अशी टीका त्यांनी केली.